मुंबई -राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाल्याने राज्य सरकारने 'ब्रेक द चेन' अंतर्गत निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत राज्य सरकारने आजच परिपत्रक काढले आहे. मात्र, मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्याचा निर्णय तेथील स्थानिक प्रशासनाचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग घेणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे मुंबई महापालिकेकडून कोणते निर्बंध शिथिल केले जाणार आहे, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -मुंबईत आदिवासी लोकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करुन केले लसीकरण
या वेळेत दुकाने, उद्याने सुरू राहू शकतात -
राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू आहेत. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी आहे त्या विभागात हे निर्बंध शिथिल करण्यात येत असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यानुसार अत्यावश्यक व अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने आणि मॉल सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत, तर शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत. रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी असणार आहे. याप्रमाणे मुंबईतील दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
50 टक्के क्षमतेने हे सुरू राहू शकते
जिम, योगा, सलून, ब्युटी पार्लर आणि स्पा एअर कंडिशन न लावता 50 टक्के क्षमतेने सुरू करता येणार आहेत. सर्व रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. त्यानंतर रात्रीपर्यंत पार्सल आणि टेकअवे सेवेद्वारे खाद्य पदार्थ विकत घेता येणार आहेत. सर्व गार्डन उद्याने यात वॉकिंग, जॉगिंग आणि सायकलिंग करता येणार आहे, असे नियम राज्य सरकारने घेतले आहेत. त्याची अंमलबजावणी मुंबईत केली जाऊ शकते.