मुंबई - देशभरात कोरोनाचा प्रसार गेले वर्षभर आहे. कोरोना विषाणूमुळे देशात पहिली लाट आली होती. तर या विषाणूमध्ये झालेल्या बदलामुळे देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्याचे समोर आले आहे. देशात अनेक ठिकाणी सध्या 'डेल्टा प्लस' विषाणूचे बदललेले रूप समोर आले आहे. या डेल्टा प्लस विषाणूमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोणताही विषाणू आपले रूप बदलत असतो. त्या बदलत्या रुपाला संशोधक नाव देतात. कोरोना विषाणूच्या बदलत्या रुपाला डेल्टा आणि डेल्टा प्लस असे नाव देण्यात आले आहे.
- काय आहे डेल्टा व्हेरियंट -
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रथम नोंदवलेला डेल्टा प्रकार हा पूर्वीपेक्षा अपेक्षेपेक्षा अधिक वेगवान होता आणि एम्समध्ये नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, 2021 मध्ये हाच व्हेरियंट देशातील दुसर्या लाटेचे कारण ठरला होते. सुरुवातीच्या काळात चीनमधून हा विषाणू भारतात आला आहे आणि सध्या देशभरात या विषाणूचा प्रादुर्भाव आहे. डेल्टा हा करोना विषाणूचा जनुकीय बदल झाल्यामुळे तयार झालेला प्रकार आहे. या विषाणूमध्ये असे बदल नियमित होत असतात. त्याची संसर्गक्षमता आता अधिक वाढली आहे. त्यामुळे पूर्वी जी लक्षणे सहा ते सात दिवसांनी दिसायची, ती आता संसर्ग झाल्यानंतर लवकर दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ न दवडता त्वरित डॉक्टरांकडे गेल्यास लक्षणांची तीव्रता वाढणार नाही. डेल्टा विषाणू हा अधिक संसर्गकारक आहे. त्यामुळे कुटुंबातील सर्व व्यक्तींमध्ये चटकन पसरतो. तो आधीच्या स्ट्रेनपेक्षा शरीरात लवकर पसरतो. त्यामुळे आजाराची लक्षणे चार ते पाच दिवसांत दिसू लागतात. या स्ट्रेनचा संसर्ग झाल्यास औषधोपचार हे कोरोनाच्या उपचारपद्धतीसारखेच आहेत. मास्क वापरणे, हात धुणे आणि गर्दीत न जाणे ही त्रिसूत्री पाळणे गरजेचे आहे.
नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट (B.1.617.2.1 किंवा AY.1) डेल्टा मधील उत्परिवर्तनामुळे किंवा B.1.617.2, व्हेरियंटमुळे तयार झाला आहे. N501Y मधील पूर्वीच्या डेल्टा उत्परिवर्तीच्या बाजूने, डेल्टा प्लसमध्ये K417Nचे उत्परिवर्तन आहे. संशोधकांना वाटते की, या दोन उत्परिवर्तनांमुळे हा विषाणू अधिक संक्रमित होऊ शकतो. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ सांगतात, कोव्हिड-19 हा RNA व्हायरस आहे. त्यामुळे व्हारस म्युटेट होण्याची शक्यता खूप जास्त असते. "डेल्टा व्हेरियंटमध्ये आणखी म्युटेशन झाल्यामुळे, नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट तयार झाला. 'डेल्टा प्लस' व्हेरियंटमध्ये डेल्टा व्हेरियंटमध्ये असलेले सर्व म्युटेशन आहेत. त्यासोबत स्पाईक प्रोटीममध्ये झालेलं K417N म्युटेशनदेखील आढळून आलंय, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
- लसीचे एक डोस घेणाऱ्यांमध्ये प्रभाव अधिक -
‘कोरोना लसीचा असर कमी होणे याचे कारण अनेक म्युटेशनमध्ये होणारा बदल मानला जात आहे. भारतात आढळलेला डेल्टा व्हेरियंट हे डेल्टा प्लस व्हेरियंटचे महत्त्वाचे कारण आहे. व्हायरस प्रभावी झाल्याने सक्षम स्वरुपांमध्ये एक जैविक लाभ मिळतो आहे, जे आहे म्युटेशन. ज्याद्वारे व्हायरसचे रुप लोकांमध्ये सहजपणे पसरते.’ ज्यांनी कोरोना लसीचा एकच डोस घेतला आहे, अशा लोकांमध्ये डेल्टा व्हेरियंटचा अधिक प्रसार होतो. यामुळे व्हायरस आणखी प्रभावी होतो. व्हायरस काहीही असो, तो नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचं रुप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधं घेतात त्यापासून वाचण्यासाठी विषाणूकडून रुप बदलं जातं. मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत.
- महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे २१ रुग्ण -
डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथे, जळगाव येथे ७, मुंबई येथे २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे ७५०० नमुने पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली होती. दरम्यान, डेल्टा प्लसमुळे देशात रुग्णाचा पहिला मृत्यू हा मध्य प्रदेशमध्ये झाला आहे.