महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Patra Chawl Scam : '...तर आम्ही रस्त्यावर देखील उतरु', पत्राचाळीतील रहिवाशांची संतप्त प्रतिक्रिया - संजय राऊत मराठी बातमी

पत्राचाळ प्रकरण घोटाळ्याप्रकरणी पीएमएलए कोर्टाने शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. पण, हे पत्राचाळ प्रकरण काय आहे ( What Is Patra Chawl Scam )?, त्याचा आढावा घेतला आहे, 'ईटिव्ही भारत'ने.

sanjay raut Patra Chawl Scam
sanjay raut Patra Chawl Scam

By

Published : Aug 1, 2022, 8:16 PM IST

मुंबई - मनी लाँड्रिंग प्रकरणी पीएमएलए कोर्टाने शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना एक प्रश्न नेहमी उपस्थित होतो तो म्हणजे 'नेमकं काय आहे पत्राचाळ प्रकरण?' ( What Is Patra Chawl Scam ) आणि यात 'संजय राऊत यांचा संबंध काय?', जेव्हा जेव्हा संजय राऊत यांच्या चौकशीचा मुद्दा समोर येतो त्यावेळी 'पत्राचाळ' हे नाव माध्यमांमध्ये गाजत असतं. त्यामुळे या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आम्ही थेट पत्राचाळ गाठली आणि इथल्या स्थानिक रहिवास्यांकडून नेमक्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे.



काय आहे नेमकं प्रकरण? -पत्राचाळ जमीन घोटाळा 2007 मध्ये सुरू झाला. हा घोटाळा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरण (म्हाडा), प्रवीण राऊत, गुरुआशिष कन्स्ट्रक्शन अँड हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) यांच्या संगनमताने झाल्याचा आरोप आहे. पत्राचाळमध्ये 500 हून अधिक कुटुंबे राहत होती. या जमिनीवर सदनिका बांधून तेथे राहणाऱ्या लोकांना देण्यात येणार होत्या. यासाठी गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी (GACPL) सोबत करार करण्यात आला. या कंपनीसोबत झालेल्या करारानुसार या भूखंडावर तीन हजार सदनिका बांधण्यात येणार होत्या. यातील 672 फ्लॅट तेथील चाळीत राहणाऱ्या लोकांना द्यायचे होते. येथे फ्लॅट बनवणाऱ्या कंपनीला जमीन विकण्याचा अधिकार नव्हता. परंतु, कंपनीने कराराचे उल्लंघन करून ही जमीन नऊ वेगवेगळ्या बिल्डरांना 1,034 कोटींना विकल्याचा आरोप आहे. एकही फ्लॅट बांधला नाही, अशी माहिती इथल्या स्थानिक रहिवाशांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

पत्राचाळ येथून आढावा घेताना प्रतिनिधी



संजय राऊत कनेक्शन? -फ्लॅट बांधण्याऐवजी गुरू आशिष कन्स्ट्रक्शनने 47 एकर जमीन आठ वेगवेगळ्या बिल्डरांना विकल्याचा आरोप आहे. यातून कंपनीला 1034 कोटी रुपये मिळाले. मार्च 2018 मध्ये म्हाडाने गुरु आशिष कन्स्ट्रक्शनविरुद्ध गुन्हा दाखल केला. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) पाठवण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेने फेब्रुवारी 2020 मध्ये या प्रकरणातील संशयित आरोपी प्रवीण राऊतला अटक केली. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्या जवळचे असल्याचे बोलले जाते. ते कंपनीत सारंग वाधवन आणि राकेश वाधवान यांच्यासह एचडीआयएलमध्ये संचालक होते. वाधवान बंधू पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत. प्रवीण राऊतला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी प्रवीण राऊतला ईडीने अटक केली आहे.



वर्षा संजय राऊत यांची देखील चौकशी -प्रवीण राऊतला ईडीने अटक करून चौकशी केली. त्यानंतर सुजित पाटकर यांचे नाव या प्रकरणात आले. सुजित पाटकर यांच्या घरावर ईडीने छापे टाकले. छाप्यात अनेक महत्त्वाची कागदपत्रे सापडली असल्याचा दावा ईडीच्या अधिकाऱ्यांनी केला. प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांनी संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना कर्ज दिल्याचे ईडीच्या तपासात समोर आले. हे कर्ज 55 लाखांचे होते. परंतु, बँकेकडून कोणतेही कर्ज न घेता ते पास झाले. वर्षा राऊत यांनी बँकेतून ५५ लाख रुपये घेऊन दादरमध्ये फ्लॅट खरेदी केला. या फ्लॅटसंदर्भात ईडीने वर्षा राऊत यांची चौकशी केली.



मुलगी देखील चौकशीच्या फेऱ्यात -म्हाडाच्या जमिनीच्या व्यवहारात प्रवीण राऊत यांना कमिशन म्हणून ९५ कोटी रुपये मिळाल्याचा आरोप आहे. ज्या सुजित पाटकरचे नाव समोर आले आणि ईडीने छापा टाकला, त्याचाही संबंध संजय राऊत यांच्याशी जोडला जात आहे. सुजित हे संजय राऊत यांच्या जवळचे मानले जातात. याशिवाय सुजित पाटकर यांची वाईन ट्रेडिंग कंपनी असून, त्यात संजय राऊत यांची मुलगी त्यांची भागीदार आहे.



टोलेजंग इमारतीमागे निराशा -सरकारने नवीन घर देण्याचं आश्वासन दिल्यानंतर 500 हून अधिक कुटुंबांनी पत्राचाळीतील आपलं निवासस्थान इतरत्र हलवलं. या चाळीच्या जागेवर मोठी इमारत बांधून यात त्यांना घर देण्यात येतील, असं आश्वासन इथल्या रहिवाशांना देण्यात आलं होतं. याबाबत बोलताना इथले रहिवासी व पत्रकार पंकज दळवी म्हणाले की, "म्हाडासोबत झालेल्या करारानुसार, प्रकल्प पूर्ण होईपर्यंत या सर्व ६७२ लोकांना दरमहा जीएसीपीलला भाडे द्यायचे होते. मात्र, हे सर्व 2014-15 पर्यंतच भाड्याने देण्यात आले. यानंतर टिनाचे छप्पर सोडून भाडेकरू बनलेल्या लोकांनी भाडे मिळत नसल्याच्या तक्रारी सुरू केल्या. एवढेच नाही तर प्रकल्पाला होत असलेल्या दिरंगाईबाबत तक्रार करत त्यांनी घरोघरी भटकंती सुरू केली. जीएसीपील द्वारे भाडे न भरल्यामुळे आणि अनियमिततेमुळे, म्हाडाने 12 जानेवारी 2018 रोजी संपुष्टात आणण्याची नोटीस पाठवली. या नोटिशीच्या विरोधात 9 बांधकाम व्यावसायिकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सर्व फेऱ्यांमध्ये प्रकल्पाचे काम ठप्प झाल्याने गरीब चाळीतील ६७२ लोकांना काहीच मिळाले नाही."



हक्काच्या घरासाठी रस्त्यावर उतरायला तयार -पंकज दळवी यांनी सांगितलं की, "आम्ही आमच्या हक्कांच्या घरांसाठी वारंवार म्हाडाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. मात्र, या अधिकाऱ्यांनी कधीच इथल्या रहिवाशांना व्यवस्थित उत्तर दिलेली नाहीत. एकदा या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला हवी म्हणजे यात खरे कोणाचे हात रंगले हे देखील समोर येईल. सध्या जे काही राजकारण सुरू आहे, त्या राजकारणाशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आज संजय राऊत यांचे नाव समोर येतंय उद्या आणखी कुणाचं नाव समोर येईल. पण, यात आमच्या घराचं काय? भविष्यात असाच जर वेळ जाणार असेल तर आम्हाला आमच्या घरांसाठी रस्त्यावरची लढाई देखील लढाईसाठी आम्ही तयार आहोत," असा इशाराही दळवी यांनी दिला आहे.

हेही वाचा -Sanjay Raut to ED Custody : संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी; वाचा, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद

ABOUT THE AUTHOR

...view details