महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सचिन वाझे प्रकरण: पाचवी मर्सिडीज जप्त, काय घडले दिवसभरात - mumbai breaking news

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याला अटक केली. त्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये आतापर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणेने 5 गाड्या जप्त केल्या आहेत.

what-happened-in-sachin-waze-case-throughout-the-day
सचिन वाझे प्रकरण: पाचवी मर्सिडीज जप्त, काय घडले दिवसभरात

By

Published : Mar 18, 2021, 7:42 PM IST

Updated : Mar 18, 2021, 7:50 PM IST

मुंबई -राज्यात सध्या एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे सचिन वाझे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार तसेच मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या कथित सहभागामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सबळ पुरावे असल्याचे सांगत एनआयएने वाझे यांना अटक केली आहे. त्यापुर्वी सत्र न्यायालयाने वाझे यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला होता. दरम्यान या प्रकरणात एनआयएने कारवाईचा धडाका लावला आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून आणखी एक जण ताब्यात-

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने बुधवारी सचिन वाझे यांच्या ठाण्यातील घराची झडती घेतली होती. त्यांच्या गाडीमध्ये काही महत्त्वाचे पुरावे आढळून आले आहेत. वाझेंसोबत आणखी एक व्यक्ती या कटामध्ये सामील असून त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे कळत आहे. मात्र, या व्यक्तीचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबईतील कार्यालयामध्ये न्यायवैद्यक प्रयोग शाळेचे एक पथक दाखल झाले असून सचिन वाझे यांनी जाळलेला सदरा आणि इतर पुराव्यांची ओळख पटविण्याचे काम या ठिकाणी केले जात आहे. या बरोबरच मुंबई पोलीस खात्यातील 'सीआययु'च्या दोन अधिकार्‍यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

वाझेंच्या झडतीत राष्ट्रीय तपास यंत्रणेला दोन सदरे मिळाले असून हे दोन्ही सदरे 25 फेब्रुवारी रोजी स्कॉर्पिओ गाडी पार्क करत असताना सचिन वाझे यांनी परिधान केली असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यातील एक सदरा सचिन वाझेंनी मुलूंड टोल नाक्याजवळ रॉकेल टाकून जाळला असल्याचीही माहिती समोर येत आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून आणखी एक जण ताब्यात-

काही आयपीएस अधिकाऱ्यांचीसुद्धा होणार चौकशी-

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सचिन वाझे ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले होते. त्या हॉटेलची तपासणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने केली असून या हॉटेलमधील सीसीटीव्ही दृश्ये पडताळून वाझेंना भेटायला येणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. यात काही राजकीय व्यक्तींचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. याबरोबरच मुंबई पोलीस खात्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांचीसुद्धा चौकशी केली जाण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

वाझेंची विशेष न्यायालयात याचिका-

वाझेंना न्यायालयाने २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. तर, वकिलांशी भेटीच्यावेळी एनआयए अधिकाऱ्यांची उपस्थिती नको, यासाठी सचिन वाझे यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याआधी वाझेंनी केलेल्या अर्जावरूनच विशेष न्यायालयाने चौकशीच्यावेळी वाझेंच्या वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती.

पाचवी मर्सिडीज गाडी 'एनआयए'ने केली जप्त-

या प्रकरणात आतापर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणेने 5 गाड्या जप्त केल्या आहेत. या अगोदर सचिन वाझे यांनी वापरलेली इनोव्हा कार, स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, 1 मर्सिडीज गाडी जप्त करण्यात आलेली होती. त्यानंतर प्राडो गाडी सह आणखी एक मर्सिडीज गाडी जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली पाचवी मर्सिडीज गाडीचा रजिस्टर नंबर हा नवी मुंबई आरटीओ मधला असून पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून केला जात आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार जप्त करण्यात आलेल्या पाचव्या मर्सिडीज गाडीच्या माध्यमातून मायकल रोडवरील परिसराची रेकी 15 दिवसांपूर्वी करण्यात आलेली होती.

अँटिलिया प्रकरण: पाचवी मर्सिडीज गाडी 'एनआयए'ने केली जप्त

फॉरेन्सिक चाचणी होण्याची शक्यता-

एनआयएने मर्सिडीज गाडी ताब्यात घेतली आहे. ही गाडी सचिन वाझे वापरत होते, अशी माहिती आहे. याची फॉरेन्सिक चाचणी होण्याची शक्यता आहे. वाझेंच्या घरुनही एक गाडी ताब्यात घेण्यात आली होती. त्यात आता पुन्हा एक मर्सिडीज गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. कार मायकल रोडवरील बिएमसी पार्किंगमध्ये स्फोटके भरुन बेसमेंटमध्ये ही गाडी पार्क करण्याचा कट होता, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

हेही वाचा-सचिन वाझेंचा प्रवास...! कोल्हापूर ते 'चकमकबाज' पोलीस अधिकारी

Last Updated : Mar 18, 2021, 7:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details