मुंबई- काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बंद दरवाज्याआड चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. एवढंच नाही. तर या भेटींनतर अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत. संजय राऊत यांनी मोदींवरती उधळलेली स्तुतीसुमने, रामदास आठवले यांनी शिवसेनेला पुन्हा महायुतीत येणासाठी घातलेली साद, शरद पवार यांनी वर्धापनदिनी शिवसेनेची केलेली स्तुती तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची केलेली घोषणा आणि नितीन राऊत यांनी उद्धव ठाकरेंची केलेली पाठराखण असो, गेल्या काही दिवसांतल्या नेत्यांच्या या प्रतिक्रियांमुळे राज्याच्या राजकारणात नक्की काय चाललंय? असा प्रश्न उभा ठाकला आहे.
संजय राऊतांकडून मोदींचे कौतूक -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना 'जेव्हा ठाकरे-मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच', असे म्हटले होते. तसेच त्यांनी ठाकरे घराण्याशी मोदींचे संबंध कसे जूने आहेत, याचा पाढाही वाचून दाखवला होता. यावेळी मोदींचे कौतूक करताना 'मोदी हे देशातील मोठे नेते असून ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि आम्हाला त्यांचा आदर आहे', असेही त्यांनी म्हटले होते. तसेच 'आमचा संघर्ष कायम नाही. केव्हा तरी त्याला पूर्णविराम द्यावा लागेल', असे सुचक वक्तव्यदेखील त्यांनी यावेळी केले होते.
आघाडी सरकारबाबत काय म्हणाले नितीन राऊत?
संजय राऊत यांनी मोदींचे कौतूक केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार लवकरच पडते की काय, अशी शंका उपस्थित करण्यात आली होती. यावर बोलताना नितीन राऊत यांनी 'हे सरकर पहाटेच नाही, तर दिवसाढवळ्या सर्वांसमोर शपथ घेणारे आहे', अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच हे सरकार भक्कमपणे उभे असून या सरकारला कोणीही पाडू शकत नाही. हे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेृत्त्वात चांगले काम करत असल्याचेही ते म्हणाले होते.