मुंबई -दिवाळी हा तिमिरातून तेजाकडे नेणारे सण. प्राचीन काळातील यक्षरात्री, दीपमाला, दीपप्रतिपदुत्सव आणि आताची दिवाळी अशी या सणाला अनेक नावांनी संबोधले जाते. दीपावली किंवा दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. दिवाळी एक प्राचीन उत्सव आहे. दिवाळी शरद ऋतूमध्ये साजरा केला जातो. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते.
दिवाळी साजरी करण्यामागील पौराणिक कथा -
अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजचे वसुबारस ते कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजचे भाऊबीज या कालावधीत दीपोत्सव साजरा केला जातो. दिव्यांची आणि त्याबरोबरीने आनंदाची उधळण करणारा हा सण राज्यासह देशविदेशात साजरा केला जातो. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. उपलब्ध पुराव्यांनुसार, दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे.
लक्ष्मीपूजनाच्या प्राचीन काळातील उपलब्ध असलेल्या संदर्भानुसार अगोदर रात्री कुबेरपूजन करण्याची रित होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करुन पूजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु, गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत.
राम चौदा वर्षांचा वनवास संपवून सीतेसह अयोध्येला परत आला, तो याच दिवसात. श्रीरामांचे स्वागत करण्यासाठी प्रजाजनांनी संपूर्ण नगरीत दिवे प्रज्ज्वलित केले होते, असे सांगितले जाते. पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. दिवाळी हा प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करुन प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. दुसरीकडे, महाभारत काळात श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध केल्यानंतर गोकुळवासियांनी आपला आनंद दिवे लावून व्यक्त केल्याची कथा प्रचलित आहे.
हेही वाचा - Diwali 2021 : धनत्रयोदशीला का करतात दागिने आणि भांड्यांची खरेदी? काय आहे त्याचे महत्त्व? जाणून घ्या...