मुंबई - पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर असे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्या एका बिझनेस समिटच्या निमित्ताने मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मुंबई दौऱ्यावर असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची त्या भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या भेटीबाबत आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर; शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेणार भेट
पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी 30 नोव्हेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. 1 डिसेंबरपर्यंत त्या मुंबईत असतील. सध्या ममता बॅनर्जी 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत.
सध्या ममता बॅनर्जी या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाला जाहीररीत्या मदत करणार असल्याचे त्यांनी म्हटलं. त्यामुळे मुंबईत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्याकडून कोणती राजकीय घोषणा केली जाणार का? याबाबत देखील चर्चा सुरू झाली आहे.
ममता बॅनर्जी त्यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसच्या प्रसारासाठी देशभरातील महत्त्वाच्या राज्यातील नेत्यांच्या भेटी घेत आहेत. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ममता बॅनर्जी यांना शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पाठिंबा दर्शवला होता. केंद्रीय सत्तेचा वापर करून पश्चिम बंगालमध्ये अशांतता पसरवण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत असल्याचा थेट आरोप शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आला होता. या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ममता बॅनर्जी या मुंबईला येणार आहेत. त्यामुळे या भेटी दरम्यान या तीनही नेत्यांमध्ये नेमकी काय राजकीय चर्चा होते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे.