मुंबई - ऐन दिवाळीच्या तोंडावर मुंबईत पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. याचे पडसाद मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले होते. स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आली होती. हा प्रकार पाण्याची पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे झाला असून येत्या दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल, अशी ग्वाही मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
सभा तहकूब -
मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या प्रभागातील पाणी गेल्या 15 दिवसांपूर्वी कापण्यात आले आहे. पालिकेच्या एफ उत्तर विभागातील एका कर्मचाऱ्याला मलबार हिल डी वॉर्ड येथे पाठवण्यात आले होते. त्या कर्मचाऱ्याला पुन्हा एफ नॉर्थ विभागात परत आणल्याने इतर कर्मचाऱ्यांना त्याचा राग आला व त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांच्या विभागातील पाणी कापले. गेले 15 दिवस याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही लक्ष न दिल्याने रवी राजा यांनी काल मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत सभा तहकुबीची सुचना मांडली. दिवाळीच्या तोंडावर सर्वच राजकीय नगरसेवकांच्या विभागात पाण्याची समस्या निर्माण झाल्याने
या तहकुबीला सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने सभा तहकूब करण्यात आली.
दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होईल - याबाबत बोलताना, दिवाळीच्या तोंडावर पाण्याच्या पाईपलाईनचे काम करू नका असे आधीच सांगितले होते. दुरुस्तीचे काम झाल्यावर पुढील काही दिवस पाण्याचा त्रास होतो. हे काम झाले असले तरी त्याचे परिणाम आता जाणवत आहेत. दिवाळी तोंडावर असताना सणाच्या दिवसात नागरिकांना पाण्याचा त्रास होत आहे. हा त्रास होऊ नये यासाठी येत्या दोन दिवसात सुट्ट्या असल्या तरी पाणी पुरवठा सुरळीत करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. दुरुस्तीचे काम झाल्यानंतरही अद्याप पाणी पुरवठा सुरळीत झाला नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, असेही निर्देश देण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिले आहेत. येत्या दोन दिवसात मुंबईत पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी ग्वाही महापौरांनी यावेळी दिली.