मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याच केली होती, त्याचा खून झाला नव्हता असा अहवाल अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने शनिवारी दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देत मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग म्हणाले, की एम्सच्या या अहवालाने मुंबई पोलिसांच्या तपासालाच दुजोरा मिळाला आहे. काही लोकांनी तपासाबाबत काहीही माहिती नसताना केवळ स्वार्थी हेतूने मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढले होते, असेही ते म्हणाले.
मुंबई पोलीस, कूपर रुग्णालयातील डॉक्टर आणि शवविच्छेदन केलेले डॉक्टर या सर्वांनी आपापले काम निष्ठेने आणि प्रामाणिकपणे केले होते. एआयआयएमएसने दिलेल्या अहवालाने आम्ही केलेला तपास योग्य होता, याची पोचपावती दिली आहे असे सिंग यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, की याप्रकरणी बिहार पोलिसांमध्ये नोंदवण्यात आलेल्या एफआयआरला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र, मुंबई पोलिसांच्या तपासामध्ये सर्वोच्च न्यायालयालाही कोणताच दोष आढळला नव्हता. आम्ही हा अहवाल बंद लिफाफ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात मांडला होता, जो केवळ सहा जणांनी पाहिला होता. यामध्ये तपास अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस उपायुक्त, पोलीस आयुक्त, राज्याचे अॅडव्होकेट जनरल आणि न्यायमूर्ती यांचा समावेश होता.
सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह १४ जूनला त्याच्या मुंबईतील राहत्या घरी आढळून आला होता. यानंतर त्याच्या वडिलांनी त्याने आत्महत्या केली नसल्याचे म्हणत, सुशांतची प्रियसी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते.
हेही वाचा :महाराष्ट्राच्या मर्दानगीची परीक्षा घेणाऱ्या गुप्तेश्वरांचा कंडू शमला काय?