मुंबई -राहूल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र काँग्रेसने हा दिवस 'संकल्प दिन' म्हणून साजरा केला. यावेळी माजी मंत्री सुनील देशमुख आणि माजी आमदार दिलीप बनसोड यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश झाला. सोबतच येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष बनवू, असा निर्धार काँग्रेस नेत्यांनी केला आहे. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा विश्वास सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित -
काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र काँग्रेसने आज 'संकल्प दिन' साजरा केला. यावेळी देशात वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यासोबतच काँग्रेसला महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष बनवण्याचा संकल्प महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच.के.पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, मंत्री यशोमती ठाकूर, मंत्री अस्लम शेख, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मंत्री विश्वजित कदम यांच्यासह इतर अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. आजच्या दिवसाचे औचित्यसाधून माजी मंत्री सुनील देशमुख यांचादेखील काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करण्यात आला. यावेळी तिरोडाचे माजी आमदार दिलीप बनसोडसह ठाणे जिल्ह्यामधील उल्हासनगर परिसरातील अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला.
'काँग्रेसला एक नंबरचा पक्ष करणार' -
'संकल्प दिनी' काँग्रेसमध्ये माजी मंत्री सुनील देशमुख आणि माजी आमदार दिलीप बनसोड यांचा पक्ष प्रवेश झाला. काँग्रेस सोडून गेलेले अनेक जण अजूनही काँग्रेसमध्ये येण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्या नेत्यांकडून संपर्क केला जात असल्याचे नाना पटोले यांनी आपल्या भाषणातून सांगितले. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर अशा सर्व नेत्यांना कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये आणण्याची मोहीम सुरू केली असल्याचेदेखील यावेळी नाना पटोले यांनी सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काँग्रेस एक नंबर एकचा पक्ष होईल, असा विश्वास नाना पटोले यांनी बोलून दाखवला आहे. तसेच ओबीसी आरक्षण, पदोन्नती आरक्षण, मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाची गुंतागुंत भाजप सरकारने वाढवली असल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला.
'स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार' -
काँग्रेस पक्ष राज्यात महाविकास आघाडी सरकार सोबत असला तरी येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते म्हणून आपण त्यांचे हात बळकट केले पाहिजेत, असे वक्तव्य आपल्या भाषणातून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार का, याबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
'स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसची ताकद वाढवा' -