मुंबई - रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबागमधील आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच्या संदर्भात रायगड पोलिसांकडून बुधवारी अटक करण्यात आली आहे. यानंतर मुंबईत मृत अन्वय नाईक यांच्या पत्नी व मुलीकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र पोलिसांचे त्यांनी आभार मानले आहेत.
अर्णब यांच्याकडून केस दाबण्याचा प्रयत्न
या पत्रकार परिषदेत त्यांनी अर्णब गोस्वामीसह इतर दोन आरोपींवर गंभीर आरोप केले आहेत. जी सुसाइड नोट सापडली होती त्यामध्ये अर्णब गोस्वामी यांचे नावसुद्धा देण्यात आले होते. गेली दोन वर्षे यासंदर्भात आपण पोलिसांकडे व न्यायालयात दाद मागत होतो. मात्र, काही केल्या आम्हाला न्याय मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. मागच्या सरकारने गोस्वामी यांच्या दबावामुळे ही केस दाबली होती, असा आरोप नाईक कुटुंबियांनी केला आहे. सुसाईड नोटमध्ये अन्वय नाईक यांनी आत्महत्येच्या कारणासाठी गोस्वामी यांना कारणीभूत ठरवून, फिरोज शेख व नितीन सरडे यांची नावं त्यात लिहिलेली होती.
आम्हाला राजकारण नकोय, न्याय हवा - नाईक कुटुंबीय
नाईक कुटुंबियांचे म्हणणे आहे की, आम्हाला या प्रकरणी राजकारण करायचं नाही. किमान माणूस म्हणून आम्हाला सपोर्ट करा आणि आम्हाला न्याय द्या. आम्ही पंतप्रधान व अनेकांना मेल करून या संदर्भात तक्रार केली होती. न्यायसुद्धा मागितला होता. 2017 ला रिपब्लिकच्या स्टुडिओचे काम पूर्ण झालं होतं. मात्र, पैसे मिळाले नव्हते, त्यामुळे लोकांची देणेही बाकी असल्यामुळे माझे वडील डिप्रेशनमध्ये गेले होते, असं अक्षता नाईक हिने म्हटले आहे. 6 कोटी 40 लाख रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट माझ्या वडिलांना मिळाला होता. मात्र, त्यातले अर्धे पैसे दिले होते. उरलेल्या पैशांसाठी माझ्या वडिलांनी गोस्वामी यांच्याकडे बऱ्याच विनवण्या केल्या होत्या. मात्र, अर्णब गोस्वामी यांच्याकडून अद्यापही 83 लाख रुपये येणे बाकी असल्याचे तिने म्हटले आहे.
या प्रकरणाचा तत्कालीन पोलीस अधिकारी भराडे यांनी ही केस मागे घेण्यासंदर्भात आमच्यावर दबाव टाकलेला होता. आम्हाला मराठी वाचता येत नाही, असा समज त्यांचा झाला होता व त्यांनी चुकीच्या पेपरवर आमची सही करून घेण्याचा प्रयत्न केला होता.
आमच्यावर दबाव, धमकी दिली जात आहे
आम्हाला दबाव टाकण्यासाठी फोन येत असून, जीवे मारण्याची भीतीसुद्धा घातली जात असल्याचे नाईक कुटुंबियांनी म्हटले आहे. मधल्या काळात आम्ही गोस्वामी यांना भेटण्याचा खूपदा प्रयत्न केला होता. पाच मिनिटे वेळ द्या म्हणून विनवण्या केल्या होत्या मात्र त्यांनी आम्हाला अजिबात वेळ दिला नसल्याचे अक्षता नाईक यांनी म्हटले आहे.