मुंबई : केंद्रीय मंत्रिमडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चांना पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला आहे. आपण पक्षावर नाराज नसल्याचे स्पष्ट करतानाच पक्षाच्या निर्णयावर आक्षेप नसल्याचे मुंडे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. समर्थकांमध्ये जी भावना आहे, ती प्रेमातून आहे. त्यांच्यासोबत चर्चा करावी लागेल असेही मुंडेंनी म्हटले आहे.
मंत्रिपद मिळालेले मुंडे साहेबांच्याच विचारांचे, त्यामुळे आनंदच
ज्यांना मंत्रिपद मिळाले आहे. ते मुंडे साहेबांच्याच विचारांचे आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळाल्याने आनंदच आहे असेही पंकजांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील ओबीसी समाज नव्याने मंत्री झालेल्यांकडे आशेने पाहत आहे असेही त्या म्हणाल्या.
पुनर्वसन हा शब्द मान्य नाही
जो उध्वस्त होतो, त्याचे पुनर्वसन होते. माझ्या घरात पूर आलेला नाही. त्यामुळे मला पुनर्वसन हा शब्द मान्य नाही असे पंकजा मुंडे राजकीय पुनर्वसनाविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाल्या.