महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कितीही चौकशा लावा आम्ही घाबरत नाही;मनीषा कायंदे यांची भाजपवर जोरदार टीका - Manisha Kayande criticizes Shelar

पुण्यातील तळेगावमध्ये उभारण्यात येणारा वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प राज्याच्या हातून निसटला आणि गुजरातला गेला आहे. पुण्यातील जागा प्रकल्पासाठी योग्य असल्याचा अहवाल कंपनीने दिल्यानंतरही अचानक हा प्रकल्प गुजरातला गेला. यावरून आता आरोप प्रत्यारोप आणि जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचे राजकारण सुरू आहे. भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी वेदांता कंपनीकडे टक्केवारी मागितल्याचा आरोप ट्विटमधून अप्रत्यक्षपणे शिवसेनेला विचारला आहे. शेलार यांच्या आरोपाला शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मनीषा कायंदे
मनीषा कायंदे

By

Published : Sep 17, 2022, 3:54 PM IST

मुंबई - वेदांत प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यामध्ये टक्केवारी मागितल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला असून त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यावर शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी, कितीही चौकशा लावा, शिवसेना घाबरत नाही असा थेट इशारा शेलार यांना दिला आहे. तसेच, बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने धाडी टाकल्या, त्यांनाच आज क्लीनचीट मिळते. भाजपला जनता दूधखुळी वाटते का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.



शिवसेनेची लोक सर्वच गोष्टीत दहा टक्के कमिशन घेतात, असा आरोप शेलार यांनी केला आहे. मात्र, गेली पंचवीस वर्ष तुम्ही मुंबई महापालिकेत शिवसेना सोबत युतीमध्ये होतात. सुधार समिती, स्थायी समिती, शिक्षण समिती आदी इतर समित्यांवर अध्यक्ष किंवा सदस्य पदाची जबाबदारी सांभाळली आहे. तुम्हाला त्यावेळी भ्रष्टाचार जाणवत होता तर तुम्ही या गोष्टीला का वाचा फोडली नाही, मूग गिळून का गप्प बसलात, सत्तेतून बाहेर का पडला नाहीत, अशा प्रश्नांचा शिवसेना नेत्या मनीषा कायदे यांनी भडिमार केला आहे. तसेच, नाकाने कांदे सोलू नका, तुम्हाला कोणत्या चौकशी लावायच्या आहेत, त्या लावा शिवसेना चौकशीला घाबरत नाही, असा थेट आव्हानही त्यांनी दिले आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना केंद्रीय तपास यंत्रणांच्या सरकारमधील अनेक आमदारांवरती धाडी पडत होत्या. बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरही ईडीने अनेक धाडी टाकल्या, अनेक चौकशा केल्या. आता भाजपसोबत गेल्याने चौकशी थांबली आहे. ईडीकडून ही क्लीनचीट देण्यात आली आहे. तुम्हाला काय वाटते, जनता दूध खुळी आहे का? असा सवाल मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे. आशिष शेलार यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी असे आव्हानही कायंदे यांनी दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details