मुंबई- मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकां प्रकरणी आणखी एक माहिती समोर आली आहे. 16 मार्च ते 20 मार्च या दरम्यान सचिन वाझे हा मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास होता अशी माहिती समोर येत आहे. यासाठी त्याने बनावट आधार कार्डसह बनावट नाव व इतर गोष्टींचा वापर केल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासात समोर आले आहे. सध्या वाझे एनआयएच्या ताब्यात आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने आत्तापर्यंत सचिन वाझें हे वापरत असलेल्या दोन मर्सडीज, एक प्राडो गाडीसह मुंबई पोलिसांची इनोवा कार व स्कॉर्पिओ कार हस्तगत केली आहे. दरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेने वाझे रहात असलेल्या ट्रायडंट हॉटेल मधील त्या रुमची तपासणी केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, बनावट आधार कार्ड सुद्धा हस्तगत केली आहेत.
एनआयएकडून हॉटेल ट्रायडंटची तपासणी
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन वाझे हे याच हॉटेल ट्रायडंटमध्ये थांबत होते. याच हॉटेलमध्ये अनेक बैठका या घेतल्या गेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी असणारे सीसीटीव्ही फुटेज हे या प्रकरणात महत्त्वाचे पुरावे ठरू शकतात. म्हणून एनआयएच्या टीमने हॉटेलमधून महत्त्वाची माहिती गोळा केल्याचे समजत आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या घरासमोर एका स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या होत्या. या प्रकरणात सचिन वाझे अटकेत आहेत. आधी या प्रकरणाचा तपास एटीएसकडे करत होते. मात्र, यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएला देण्यात आला. या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या गाड्यांची तपासणी करण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी किती किलोमीटर आणि कोणकोणत्या लोकेशनवर गेली आहे? याचा तपास करण्यात आल्याची माहिती समजते.
एनआयएचा जलद तपास
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक प्रकरणी एनआयए वेगात तपास करत आहे. याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना देखील अटक केली आहे. दरम्यान, याप्रकरणात तपासाच्या वेगाला गती मिळत आहे. सीएसएमटी स्थानकाबाहेर मनसुख हिरेन यांना एक मर्सिडिज कार घ्यायला आली होती. हिरेन त्या कारमधून गेले. तर परत आलेच नाहीत, असा संशय एनआयएला आहे. त्यामुळे एनआयएने ती कार ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी आतापर्यंत ताब्यात घेतलेली ही तिसरी कार आहे. या प्रकरणात एनआयए संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. यामध्ये सीएसएमटी स्थानकाबाहेर मनसुख हिरेन कोणाची तरी वाट पाहत असल्याचा सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती लागला आहे. या सीसीटीव्हीत एक मर्सडिज कार येते आणि मनसुख हिरेन त्या कारमध्ये बसुन जातात. एनआयएला असा संशय आहे की, मनसुख हिरेन हे त्यानंतर बेपत्ता झाले. या प्रकरणी ही मर्सडिज कार तपासाचा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. या कारची झडती घेतली असता. कारमध्ये पाणी बॉटल, 5 लाख रुपये रोख, पैसे मोजण्याची मशीन व काही कपडे सापडले आहेत. अधिक तपास एनआयए करत आहे. दरम्यान, ही जप्त करण्यात आलेली मर्सिडीज गाडी सारांश भावसार यांच्या मालकीची असून, त्यांनी या गाडीचा सौदा केला होता अशी माहिती समोर आली आहे.