मुंबई - महानगरपालिका क्षेत्रातील 'एफ दक्षिण’ व ‘ई’ या दोन विभागातून जाणारी 1 हजार 450 मिलिमीटर व्यासाची पाइपलाईन बदलण्यात येणार आहे. हे काम 11 ते 12 सप्टेंबर रोजी होणार असल्याने परळ, शिवडी, नायगांव आदी परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
11 आणि 12 सप्टेंबरला परळ, शिवडी, नायगांव आदी परिसरातील पाणीपुरवठा राहणार बंद - water supply in naigaon
महानगरपालिका क्षेत्रातील जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या महापालिकाद्वारे टप्प्या-टप्प्याने बदलण्यात येत आहेत. ‘एफ दक्षिण’ व ‘ई’ या दोन विभागातून जाणारी सुमारे 4 किमी लांबीची जलवाहिनी बदलण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे 11 आणि 12 सप्टेंबरला परळ, शिवडी आणि नायगाव परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
महानगरपालिका क्षेत्रातील जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या महापालिकाद्वारे टप्प्या-टप्प्याने बदलण्यात येत आहेत. ‘एफ दक्षिण’ व ‘ई’ या दोन विभागातून जाणारी सुमारे 4 किमी लांबीची जलवाहिनी बदलण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. या अंतर्गत जकेरीया बंदर मार्गाखाली असलेली 1हजार 450 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनी ऐवजी नवी 1 हजार 500 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम होणार आहे. ही जलवाहिनी सुमारे 100 वर्षांपूर्वीची आहे. त्याचबरोबर ‘एफ दक्षिण’ विभागातील पाणी पुरवठा सुस्थितीत करण्यासाठी शिवडी येथील बस डेपो जवळ 600 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी नव्या जलवाहिनीला केली जाणार आहे. ही कामे शुक्रवारी (११ सप्टेंबर) रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते शनिवारपर्यंत २४ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहेत.
या कामांमुळे जलवाहिनीशी संबंधित असणाऱ्या प्रामुख्याने परळ, शिवडी, नायगांव, घोडपदेव आदी परिसरातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा 24 तास किंवा अधिक काळासाठी पूर्णत: बंद राहणार आहे. तसेच या कालावधी दरम्यान दादर, हिंदमाता, लालबाग इत्यादी परिसराला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी या परिसरातील नागरिकांना खबरदारीची उपयोजना म्हणून पाण्याचा पुरेसा साठा करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. पाणी काटकसरीने वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे.