मुंबई -मागील वर्षी पाऊस कमी पडल्याने १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यात आता मुंबईकरांना २.४८ टक्के पाणी दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. ही दरवाढ १६ जूनपासून लागू करण्यात येणार आहे.
भातसा, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडक सागर, विहार आणि तुळशी या सातही धरणांतून मुंबईकरांना दररोज ३ हजार ८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाणी चोरी आणि गळतीमुळे दररोज ८०० ते ९०० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. महापालिकेकडून मुंबईकरांना पाणीपुरवठा केला जातो, त्यासाठी खर्चात वाढ होत असल्याने २०१२ पासून दरवर्षी ८ टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. २०१७-१८ मध्ये जल विभागाला ८३६.६० कोटी खर्च आला होता. २०१८-१९ मध्ये त्यात वाढ होऊन हा खर्च ८५७.३२ कोटींवर गेला आहे. खर्चात २.४८ टक्के दरवाढ झाल्याने घरगुती आणि बिगर घरगुती ग्राहकांवर ही दरवाढ लागू केली जाणार आहे, अशी माहिती जलविभागाने स्थायी समितीत दिली. या दरवाढीला विरोधी पक्षांनी विरोध केला आहे.