मुंबई : 370 कलम रद्द होऊनही जम्मू-काश्मीरमध्ये सुधारणा झाली नाही असे संजय राऊत बोलत असतील तर त्यांनी 370 कलम हटवणे ही चूक होती का? हे स्पष्ट करावं असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. ड्रग्स-गांजा यांची बाजू कोण घेत आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे. कोणाचे जावई अटकेत होते? ते महाराष्ट्राने पाहिले आहे असे सांगत दरेकर यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
शिवसेनेवरही टीका
सामना अग्रलेखातून भाजपवर गरळ ओकण्याचे काम सातत्याने सुरू आहे. ज्या गोष्टींचा चोथा झालेला आहे त्या केंद्रीय यंत्रणा बाबत वारंवार उल्लेख करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम महाविकासआघाडी सरकार मधील नेते करत आहेत असेही दरेकर म्हणाले. पंकजा मुंडे यांचं मत विचारात घ्या असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर बोलताना प्रवीण दरेकर यांनी शिवसेना ही उपऱ्यांची झालेली आहे. पंकजा मुंडे यांचे मतही विचारात घेऊ. परंतु, अनंत गीते, रामदास कदम, प्रताप सरनाईक यांनी जी भूमिका मांडली त्यावर सुद्धा शिवसेनेने लक्ष द्यावं असा टोमणा प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.
फडणवीसांनी ती चूक मान्य केली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा पाहून देवेंद्र फडणीस यांचे डोळे दिपले. आम्ही शपथ लोक झोपेत असताना लपून-छपून, कड्या कुलपात लपत-छपत घेतली नाही. या संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना प्रवीण दरेकर यांनी अजित पवारांना बरोबर शपथ घेणे ही चूक होती व ती देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे. परंतु त्याच अजित पवार बरोबर तुम्ही मांडीला मांडी लावून शपथ घेतली असं वक्तव्य केलं आहे. सध्या राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरू असल्याने महाविकास आघाडी सरकारमधील नेते अस्वस्थ झाले आहेत. या तपास यंत्रणांचा गैरवापर करून भाजप सूडबुद्धीने राजकारण करत असल्याची टीका महविकास आघाडी करत असताना दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणा बाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काम राज्य सरकार करत आहे असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.