मुंबई -राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला. मोठं नुकसान कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये झाले होते. जीवितहानी देखील झाली होती. मात्र अजूनही राज्यावरील संकट टळलेले नाही. कारण पुन्हा एकदा हवामान विभागाने राज्यातल्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
उद्या 'या' जिल्ह्यात मुसळधार
मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले होते, अजून देखील या जिल्ह्यांची नुकसान पाहणी सुरू आहे. मात्र अशातच पावसाचा पुन्हा एकदा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबईत उद्या (शुक्रवारी) काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाचा सर्वात जास्त फटका रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला बसला होता. पुन्हा एकदा या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये 2 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापुरात देखील उद्या मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.
'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट
राज्यात मागील आठवड्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला होता. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये मदत कार्य सुरू आहे. जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे पुन्हा एकदा या भागातील नागरिकांचे मनस्ताप वाढले आहे. सर्वात जास्त फटका बसलेल्या जिल्ह्यांमध्ये रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुन्हा एकदा पावसाचे संकट या जिल्ह्यावर घोगवंतांना दिसत आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.