मुंबई -राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ( Presidential election ) भारत निवडणूक आयोग ( Election Commission of India ) नवी दिल्ली यांनी आज मतपेट्या, मतपत्रिका, विशेष पेन आणि इतर सीलबंद निवडणूक साहित्याचे वाटप केले आहे. हे सर्व साहित्य नवी दिल्ली येथून विमानाने आणण्यात आले आहे. या सर्व साहित्यांची वाहतूक करताना विशेष म्हणजे बॅलेट बॉक्स ( Ballot box ) ही व्यक्ती आहे असे समजून तिकीट काढण्यात आले. हे सर्व साहित्य मंत्रालयातील सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी श्रीमती शुभा बोरकर तसेच विधानभवनातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर आणि अवर सचिव सुभाष नलावडे यांनी नवी दिल्लीहून मुंबईत आणले आहे.
सोमवारी राष्ट्रपतीपदासाठी मतदान - येत्या 18 जुलै 2022 रोजी राष्ट्रपती पदाकरीता भारताची राजधानी दिल्ली, पुंडूचेरी केंद्रशासित प्रदेश आणि राज्य विधानमंडळ सचिवालये येथे मतदान होणार आहे. त्यानुसार विधिमंडळात त्याची तयारी सुरू झाली आहे. भारत निवडणूक आयोगाने पाठविलेले निवडणूक साहित्य मुंबई विमानतळ येथून महाराष्ट्र विधानभवन येथे आणण्यात आले. हे साहित्य महाराष्ट्र विधान भवन येथे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिमंडळ सचिवालयाच्या स्ट्राँग रूम येथे पूर्ण सुरक्षित आणि योग्य त्या खबरदारीसह ठेवण्यात आले आहे.
द्रोपदी मुर्मू, यशवंत सिन्हा उमेदवार -18 जुलै 2022 रोजी राष्ट्रपती पदाकरीता दिल्ली, पुंडूचेरी केंद्रशासित प्रदेश आणि राज्य विधानमंडळ सचिवालये येथे मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील आघाडीकडून माजी राज्यपाल द्रोपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विरोधी पक्षांच्या वतीने देशाचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. देशाचे सर्वोच्च पद असलेल्या या पदासाठी या दोनच उमेदवारांमध्ये ही निवडणूक होत आहे. यामध्ये द्रोपदी मुर्मू यांचे पारडे जड दिसत आहे.