मुंबई -राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी ते खासदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे निवडणुकीचे धुमशान अनेक गावात सुरू आहे.
कोरोनाचे संकट ओसरत असताना निवडणूक आयोगाने राज्यात ३४ जिल्ह्यांमधील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली होती. या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने काही बदल केले आहेत. याबाबतचा २४ डिसेंबरला जीआर काढण्यात आला आहे. या जीआरनुसार निवडणूक अर्ज भरताना अर्जदार २१ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा, उमेदवाराचे नाव मतदार यादीत असावे. उमेदवार जर १ जानेवारी १९९५ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असेल आणि ज्यांना कोणत्याही कायद्याने बाद ठरवले नसेल, त्यांना सातवी पास असल्याशिवाय सरपंच म्हणून निवडून दिले जाऊ शकणार नाही.
हेही वाचा-ग्रामपंचायत रणधुमाळी : ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी
गडचिरोलीत दोन टप्प्यात मतदान
नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहूल गडचिरोली जिल्ह्यात कोणतीही निवडणूक असो, पोलीस प्रशासनासमोर ते मोठे आव्हान असते. निवडणूक पार पाडण्यासाठी पोलीस विभागाची मोठी भूमिका असते. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 361 ग्रामपंचायतीत निवडणुका पार पडणार आहेत. जिल्ह्यात दोन टप्प्यात मतदान पार पडणार असून पहिल्या टप्प्यात 15 जानेवारी, तर 20 जानेवारीला दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे. संवेदनशील भागात पोलिंग पार्ट्या हेलिकॉप्टरद्वारे रवाना करण्यात आल्या असून, दोन हेलिकॉप्टर पोलिसांच्या मदतीला राहणार आहेत.