महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

काँग्रेसचे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांचा राजीनामा; पुन्हा शिवसेनेत करणार प्रवेश?

लोकरे हे पूर्वी शिवसेनेचे नगरसेवक होते. काही वर्षांपूर्वी नारायण राणे यांच्यासोबत लोकरे यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा तसेच काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान लोकरे पुन्हा स्वगृही म्हणजेच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

विठ्ठल लोकरे

By

Published : Aug 4, 2019, 7:57 AM IST

मुंबई -काँग्रेसचे मानखुर्द, वॉर्ड क्रमांक 141 चे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी काँग्रेस पक्षातील ईशान्य मुंबई काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा तसेच काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सुनंदा विठ्ठल लोकरे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान लोकरे पुन्हा स्वगृही म्हणजेच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.


लोकरे हे पूर्वी शिवसेनेचे नगरसेवक होते. शिवसेनेला जय महाराष्ट्र करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यावेळी लोकरे यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मुंबई महापालिकेच्या 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 141 मधून काँग्रेसकडून निवडणूक लढवणारे विठ्ठल लोकरे विजयी झाले होते. त्यांना काँग्रेसने जेष्ठ नगरसेवक म्हणून महापौर पदासाठी निवडणूक लढवण्याची संधी दिली होती. पालिकेच्या सुधार समितीमध्ये त्यांना सदस्य बनवण्यात आले होते. नुकतीच त्यांची स्थायी समिती सदस्य पदी निवड झाली होती. 2012 ते 2017 या कालावधीत त्यांच्या पत्नी सुनंदा लोकरे या काँग्रेसच्या नगरसेविका होत्या.

लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना नेहमीच जनतेचा विचार करावा लागतो. आपले बहुमूल्य मत देऊन आपल्यावर विश्वास दाखविणाऱ्या जनतेच्या भल्यासाठी काही अपरिहार्य निर्णय घ्यावे लागतात. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देण्याचा निर्णयही याच अपरिहार्यतेतून घेतला आहे. आमची कोणाबाबत काहीही तक्रार नाही. हा निर्णय सदैव आमच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या जनतेच्या भल्यासाठीच घेतला आहे. माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांसोबत विचारविनिमय करून लवकरच पुढच्या वाटचालीचा निर्णय घेणार असल्याचे लोकरे यांनी सांगितले. दरम्यान लोकरे पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details