महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनाच्या राज्यावरील ग्रहणाला वर्ष पूर्ण; दुसरी लाट थोपविण्याचे आव्हान

कोरोनाने राज्यात शिरकाव करून वर्ष पूर्ण होत असताना या महामारीची दुसरी लाट थोपविण्याचे आव्हान आहे. याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष अविनाश भोंडवे म्हणाले की, एका वर्षाचा इतिहास हा अत्यंत कडवट आहे.

By

Published : Mar 9, 2021, 7:13 PM IST

Updated : Mar 9, 2021, 7:46 PM IST

corona update
कोरोना अपडेट

मुंबई - राज्यात कोरोनाने 9 मार्च 2020 ला प्रवेश करून आज वर्ष पूर्ण झाले आहे. या एका वर्षाच्या काळात कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांना जबर फटका बसला आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण देशात असल्याने राज्यातील अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत.

कोरोनाने राज्यात शिरकाव करून वर्ष पूर्ण होत असताना या महामारीची दुसरी लाट थोपविण्याचे आव्हान आहे. याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष अविनाश भोंडवे म्हणाले की, एका वर्षाचा इतिहास हा अत्यंत कडवट आहे. हा आजार नेमका काय आहे, याचे निदान कसे होते ? याच्यावर उपचार काय आहेत, याची कोणतीही कल्पना डॉक्टरांना नव्हती. पहिला रुग्ण सापडल्यानंतर कोरोनाने संपूर्ण महाराष्ट्रात वेगाने हातपाय पसरायला सुरुवात केली.

भारतीयांमध्ये सामुहिक प्रतिकारक्षमता निर्माण होण्याची शक्यता-

सरकारी रुग्णालयात रुग्णांना जागा नव्हती. 25 मार्चपासून 21 दिवसांचा पहिली टाळेबंदी जाहीर केली. टाळेबंदीमध्ये नेमके काय करावे, याची कल्पना नागरिकांना नव्हती. मास्क का घालावा ? सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय ? हात धुवण्याचे महत्त्व नागरिकांना माहित नव्हते. वैद्यकीय क्षेत्राने रुग्णांवर उपचार करायला सुरुवात केली. हळूहळू उपचार होत गेले. रुग्ण बरे होत गेले. मात्र सप्टेंबर व ऑक्टोबर च्या दरम्यान रुग्णांची संख्या प्रचंड वाढली. सप्टेंबरच्या 18 तारखेला २३ हजार रुग्ण एकाच दिवशी सापडले. डॉक्टर आणि प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येऊन ही कोरोनाची लाट काही प्रमाणात थोपवण्यात यश आले. त्यातच कोरोनाची लस आली आहे. लसीकरणाची मोहिम पुढील सहा महिने चालूचर राहणार आहे. 70 टक्के लसीकरण झाल्यानंतर भारतीयांमध्ये सामुहिक प्रतिकारक्षमता निर्माण होईल. त्यामधून कोरोना नष्ट होईल. सध्या, मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्या वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात येईल, असा विश्वास डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला आहे.

हेही वाचा-कांदा, लसूण, मसाला फोडणीसह कालव्याचा रस्सा ही पर्यटकांसाठी पर्वणी

अशी आहे मुंबईमधील स्थिती-

मुंबईत गेल्या महिनाभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र चाचण्यांच्या प्रमाणात पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णाचे प्रमाण कमी आहे. यामुळे सध्या तरी लॉकडाऊनचा विचार नाही. मात्र मुंबईकरांनी नियम पाळले नाहीत, नागरिकांनी सहकार्य केले नाही, आणि रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर मात्र अंशता लॉकडाऊनचा विचार करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. मुंबईकरांनी कोरोनाच्या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

हेही वाचा-मनसुख हिरेन, खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरून विधानसभेत गोंधळ

मुंबईत गेले अकरा महिने कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार काही प्रमाणात कमी झाला असतानाच पुन्हा रुग्ण संख्या वाढत आहेत. त्यावर मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबईत अंशता लॉकडाऊन लावावा लागेल असे म्हटले आहे. रुग्ण आढळून येणाऱ्या विभागात इमारती आणि चाळी सील केल्या आहेत. एकाच ठिकाणी रुग्णसंख्या वाढली तर कंटेन्टमेंट झोनची कडक अंमलबजावणी केली जाईल. त्यासाठी पालिकेने तयारी ठेवली आहे अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर, रुग्ण आढळून येणाऱ्या विभागात अंशतः टाळेबंदी लावावी लागू शकते, असा इशाराही काकाणी यांनी दिला आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची आकडेवारी -

मुंबईत काल सोमवारपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 34 हजार 572 वर पोहचला आहे. मृतांचा आकडा 11 हजार 504 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 11 हजार 407 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 10 हजार 779 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 225 दिवस इतका आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 34 लाख 34 हजार 610 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईमधील लसीकरणाची आकडेवारी

मुंबईत 16 जानेवारीपासून आतापर्यंत 3 लाख 90 हजार 938 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्यात 1 लाख 62 हजार 598 आरोग्य कर्मचारी, 1 लाख 11 हजार 78 फ्रंटलाईन वर्कर, 1 लाख 5 हजार 867 ज्येष्ठ नागरिक तर 45 ते 59 वयातील गंभीर आजार असलेल्या 11 हजार 395 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

पुण्यात कोरोना केक कापून निषेध

वर्षभरानंतरही राज्यात कोरोनाचा उद्रेक कमी झालेला नाही. त्यामुळे पुण्यात मनसेने उपहासात्मकपणे कोरोना केक कापून 'गो कोरोना गो' अशी घोषणाबाजी केली. मनसेच्या नेत्या रुपाली पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा केक कापत सरकारच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त केला. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सरकारची आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केला आहे. पुणेकरांवर पुन्हा टाळेबंदी लादण्याऐवजी आरोग्य यंत्रणा सक्षम करावी, अशी मागणी रुपाली पाटील यांनी केली.

राज्यातील लसीकरणाचा थोडक्यात आढावा ( 8 मार्चप्रमाणे)

राज्यात सोमवारी एकूण 1 लाख 22 हजार 758 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यातील 1 लाख 7 हजार 165जणांचा पहिला तर, 15 हजार 593जणांचा दुसरा डोस होता. 8 हजार 717 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला तर 11 हजार 865 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला.

राज्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी (8 मार्चप्रमाणे)

राज्यात सलग 3 दिवस नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या 10 हजारांच्या घरात होती. मात्र, सोमवारी (8 मार्च)अल्प प्रमाणात नव्या रुग्णसंख्येत घट झाली. राज्यात सोमवारी नव्या 8 हजार 744 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 22 लाख 28 हजार 471 इतकी झाली आहे.

औरंगाबादमध्ये पुन्हा टाळेबंदी लागण्याची शक्यता

औरंगाबाद शहरात वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता पुन्हा टाळेबंदी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर टाळेबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला तर हे दुसऱ्यांदा टाळेबंदी लागणारे पहिले शहर होईल, अशी शक्यता आहे. तत्पूर्वी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 11 मार्च ते 4 एप्रिल याकाळात अंशतः टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चार एप्रिलपर्यंत पर्यटनस्थळ राहणार बंद...

औरंगाबाद जिल्हा हा पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखला जातो. पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी टाळेबंदी लावण्यात आली. त्याआधी जिल्ह्यातील पर्यटन स्थळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चार महिन्यांआधी पर्यटनस्थळ पुन्हा सुरू करण्यात आली होती. मात्र, कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने चार एप्रिलपर्यंत पुन्हा पर्यटन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशकात टाळेबंदी

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवारी खरेदीसाठी नागरिक मोठया संख्येने बाहेर पडत आहे. मात्र, कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेता या दोन्ही दिवशी शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जारी केले आहेत. असे असले तरी अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. नाशिकमध्ये रोज 500 ते 600 नवीन रुग्णांची भर पडत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनासमोर सर्वात मोठे आव्हान आहे. त्यादृष्टीने निर्बंध लावण्यात आले आहेत.

Last Updated : Mar 9, 2021, 7:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details