मुंबई -युरोपिय देशातील एखाद्या आभासी चित्रपटात अनेक चमत्कारीक आणि अकल्पीत अशा अनेक घटना नजरेसमोर आणून उभ्या केल्या जातात, आणि त्या सत्य असल्याचे भासविले जाते. आभासी चित्र खरे वाटते. असाच काहीसा अनुभव रविवारी, २३ जानेवारी रोजी आयआयटी मुंबईच्या दीक्षांत सोहळ्यात मिळणार आहे. आयआयटी मुंबईने विविध तंत्रज्ञानाचा वापर करत जगातील पहिला असा आभासी दीक्षांत सोहळा आयोजित करण्याची तयारी केली आहे. यासाठी आयआयटीतील प्राध्यापकांच्या एका चमूने आभासी कॅम्पसचे एक विश्वच साकारले असल्याने हा सोहळा मोठा मनोरंजक आणि आदर्श ठरण्याची शक्यता आहे.
रविवारी, २३ ऑगस्टला आयआयटी मुंबईतील हा सोहळा ‘आभासी वास्तव’ आणि ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’ याचा वापर करून विद्यार्थ्यांना घरबसल्या अनुभव घेता येणार असून यासाठीची सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती आयआयटी मुंबईकडून देण्यात आली. पहिलाच आभासी दीक्षांत सोहळा असून त्यातून मिळणाऱ्या आनंदापासून वंचित राहू नये, यासाठी संस्थेतील प्राध्यापक दीपक चौधरी यांनी त्यांच्या २० जणांच्या चमूसह एक आभासी विश्व साकारले आहे. ज्यातून विद्यार्थ्यांना ते प्रत्यक्ष दीक्षांत समारंभात आहे असाच आभास अनुभवता येणार आहे.
काय आहे आभासी कॅम्पसचे विश्व?
आयआयटीतील प्राध्यापक पराग चौधरी यांनी आभासी कॅम्पस तयार केला आहे. ज्यात विद्यार्थ्यांचे गप्पांचे ठिकाण, प्रयोगशाळा, हॉस्टेल्सचा समावेश आहे. विद्यार्थी तेथे आपल्या मित्रांसह एकावेळी भेटू शकणार आहेत. यासाठी शनिवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून विद्यार्थी या आभासी विश्वात आपल्या मित्रांशी गप्पा मारू शकणार आहेत. तसेच आपल्या प्राध्यापकांशीही संवाद साधू शकणार आहे. तर हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी २० जणांच्या चमूने सुमारे पाच हजार तासांपेक्षा जास्त कालावधी काम केल्याचे प्रा. शुभाषिश चौधरी यांनी सांगितले.