मुंबई -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची पंतप्रधानांनी साधी दखलही घेतलेली नाही. आज प्रजासत्ताक दिन आहे, मात्र आजचा काळा दिवस असल्याची टीका थोरात यांनी केली आहे.
आज काळा दिवस
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला 61 दिवस आता पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांचे अभूतपूर्व आंदोलन सुरू आहे. केंद्राने केलेले कायदे रद्द करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांनी देशाला पोसले आहे. त्यांच्यावर ही वेळ येणे दुर्दैवी असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. आज प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करतोय, पण आज काळा दिवस आहे अशी टीकाही थोरात यांनी केली आहे. चर्चेच्या 10 फेऱ्या झाल्या मात्र काहीही तोडगा निघालेला नाही. पंतप्रधानांनी साधी दखलही घेतली नाही. पंजबा-हरयाणाच्या शेतकऱ्यांनी हरीत क्रांती केली, त्यांची मागणी सरकारने ऐकली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेसची भूमिका ही शेतकऱ्यांच्या बाजूची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणे भाजपला महागात पडेल - गुलाबराव पाटील
महाविकास आघाडीने तयार केली समिती
या कायद्यासंदर्भात महाविकास आघाडीने एक समिती तयार केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीची एक बैठकही झाली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताचे कायदे आम्ही करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे. महाविकास आघाडी 1 वर्षाच्या कामाचे कौतुक देशभरातून होत आहे. त्यामुळे विश्वास आहे हे सरकार 5 वर्ष चालणार आहे. त्यामुळे जी लोक काँग्रेसच्या बाहेर गेली त्यांनाही परत यावं अस वाटतंय असेही थोरात यांनी म्हटले आहे. सिंधूताई सपकाळ यांना पद्म पुरस्कार मिळाल्याचा आनंद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.