मुंबई- कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबई अनलॉकच्या दिशेने जात आहे. अशात मुंबई शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असल्याचे समोर आले आहे. सप्टेंबर महिन्यात अल्पवयीन मुली व महिलांवर बलात्कार, अपहरण आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट.
लॉकडाऊन काळात मुंबईत सप्टेंबर महिन्यात तब्बल ४५९ गुन्हे घडले आहे. यात बलात्काराचे ७८ गुन्हे आहेत. यापैकी अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचे ३६ गुन्हे, महिलांवरील बलात्काराचे ४२ गुन्हे आहेत. ऑगस्ट महिन्यात ३३६ गुन्हे हे महिलांच्या बाबत घडले होते. ३३ अल्पवयीन मुलींवर आणि २२ महिलांवर बलात्कार झाले होते. सप्टेंबर महिन्यात मुंबई शहरात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या ७७ घटना घडल्या. यामध्ये ४२ अल्पवयीन मुलींची सुखरूप सुटका पोलिसांनी केली आहे. विनयभंगाचे १९९ गुन्हे, हुंडाबळीमुळे आत्महत्या होण्याचे २ गुन्हे, हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळवणूकसंदर्भात ४६ गुन्हे, असे एकूण ४५९ गुन्हे नोंदण्यात आले. तर, २६९ प्रकरणांचा पोलिसांनी तपास पूर्ण केला आहे.