मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात काही जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याची वेळ आलेली आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून निर्बंधही लादण्यात आलेले आहेत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकारचे निर्देश दिले आहेत. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमातच कोरोना नियम धाब्यावर बसवल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमात चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ हे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात तूफान गर्दी पाहायला मिळाली.
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन हेही वाचा -गोकुळच्या निवडणुकीत भाजपला प्रतिनिधित्व द्या- चंद्रकांत पाटील
राष्ट्रवादीकडून कोरोना नियमांचे उल्लंघन -
अहमदनगरमधील अकोले तालुक्यातील सहकार क्षेत्रातील नेते सिताराम गायकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा प्रवेश केला. त्यांच्यासोबतच सहकार क्षेत्रातील 72 नेत्यांचा यावेळी पक्ष प्रवेश अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या हस्ते झाला. मात्र हा पक्ष प्रवेश होत असताना अमरावतीतील नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभागृहात गर्दी केल्याचे पाहायला मिळालं. सोशल डिस्टंसिंग या प्रकारचा कोणताच नियम या कार्यालयात पाळला गेला नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून सातत्याने सामान्य नागरिक तसेच हॉटेल व्यवसायिक, सिनेमागृह यांना नियमावली जाहीर केली जाते. नुकतीच राज्य शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार लग्न समारंभासाठी केवळ पन्नास लोकांची उपस्थिती असणार आहे तर, तिथेच अंत्यविधीसाठी केवळ वीस लोकांना अनुमती देण्यात आलेली आहे. जर सामान्य नागरिकांना अशा प्रकारचे नियम राज्यसरकार लावत असेल तर पक्षातील कार्यक्रमांना ते नियम लागू पडत नाहीत का? अशा प्रकारचा प्रश्न सामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
हेही वाचा -सचिन वाझे प्रकरण समोर करून, डेलकर प्रकरण दाबण्याचा भाजपचा डाव - पटोले