मुंबई -मराठा समाजाच्या आरक्षणावर आज न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता आरक्षणावर येत्या 5 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकार वेळकाढूपणा करत असून, सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षणाला विलंब होत असल्याचा आरोप शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला आहे. तसेच आता इथूनपूढे मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत बोलावलेल्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान मराठा आरक्षणाचा तिढा सुटेल अशी अपेक्षा मराठा समाजाला असताना, पुन्हा एकदा त्यांची निराशा झाली आहे. सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, पुढील सुनावणी 5 फेब्रुवारीला पाच न्यायमूर्तींच्या बेंचसमोर होणार आहे. आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. शिवसंग्राम संघटनेचे नेत विनायक मेटे यांनी अशोक चव्हाणांवर टीका केली आहे.