मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची निवड झाली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष, खासदार, फौजिया खान यांनी याबाबतची घोषणा मुंबईत केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे राज्य महिला आयोगाचा कारभार सोपविण्यात आल्या नंतर हे पद रिकामी झालं होतं. या पदी आता विद्या चव्हाण यांची दुसऱ्यांदा या पदावर वर्णी लागली आहे.
कोण आहेत विद्या चव्हाण? -समाजवादी चळवळ मुंबईत जोरदार असताना विद्या चव्हाण या राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून मृणाल गोरे यांच्या संपर्कात आल्या. महिला, गरीब झोपडपट्टी धारक यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर मोर्चे आंदोलने करता करता त्या जनता दलाच्या पक्ष राजकारणात गुंतल्या. संघर्ष हा त्यांचा मूळ पिंड कायम ठेवत जनता दलात असताना बोरवली मधील झोपडपट्ट्यांच्या प्रश्नावर केलेली लढाई असो की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर डान्सबारच्या विरुद्ध त्यांनी केलेला संघर्ष विद्या चव्हाण या पक्षात कुठल्याही असल्यातरी ऐंशीच्या दशकात मुंबईच्या रस्त्यावर गोरगरिबांसाठी संघर्ष करणाऱ्या मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर त्यांच्या साखळीतील पुढची कडी विद्या चव्हाण होत्या. 2004 मध्ये विद्या चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्या मुंबई महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेल्या. खासकरून महिला व श्रमिकांच्या प्रश्नावर त्या पालिकेत व पालिके बाहेर कायम आक्रमक भूमिका घेत संघर्ष करत राहिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी विद्या चव्हाण यांच्यातील धडाडी पाहून त्यांना २०१० साली महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यानंतर वर्षभरातच पक्षाने त्यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी दिली. त्यापुढे 9 वर्ष विधानपरिषद सदस्य होत्या. आता पुन्हा विद्या चव्हाण यांना पक्षाने महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.