मुंबई - महाविकास आघाडीकडून मांडण्यात आलेला राज्याचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे गोलमाल आहे. सामान्य जनतेच्या तोंडाला पाने पुसणारा आहे. राज्यपालांचे अभिभाषण राज्याची आगामी दिशा दर्शवणारी असते. अर्थसंकल्पामध्ये मात्र राज्यपालांच्या अभिभाषणाला केराची टोपली दाखवण्यात आली असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यातील आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
हेही वाचा...'कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृती करण्याचे पवारांकडून आदेश - नवाब मलिक
विधानपरिषदेत मंगळवारी अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेची सुरुवात विरोधीपक्ष नेत्यांच्या भाषणाने झाली. त्यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, या अर्थसंकल्पातून सामान्य आणि मध्यम वर्गीयांच्या हाती घोर निराशा झाली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे आंतरराष्ट्रीय स्मारक तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समुद्रातील शिव स्मारकाचा उल्लेख आहे. मात्र, अर्थसंकल्पामध्ये महाविकास आघाडी सरकारला याचा विसर पडला आहे, असे दरेकर म्हणाले.
अनुसूचित जाती-जमाती आणि आदिवासी विकास विभागासाठी कोणत्याही नवीन योजना सरकारला देता आल्या नाहीत. ऊर्जा मंत्र्यांनी वीज ग्राहकांसाठी १०० युनिटपर्यंतची वीज मोफत देऊ अशी घोषणा केली होती. मात्र, अर्थसंकल्पात यासाठी कोणतीही तरतूद दिसत नाही. पेट्रोल व डिझेल यामध्ये वाढ केल्याचा थेट परिणाम हा सामान्य नागरिकांवर होणार आहे. शेतकऱ्यांसाठीच्या प्रोत्साहीत योजनांसाठी भरीव तरतूद नाहीत. ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून प्रतिसाद दिला, त्या कोकणासाठी मात्र अर्थसंकल्पात भरीव तरतूद नाही. कोकणातील मच्छीमारही या अर्थसंकल्पात उपेक्षित राहिला आहे. राज्यातील साखर कारखान्यांना या अर्थसंकल्पामधून कोणतीही उभारी मिळालेली नाही, अशीही टीका त्यांनी केली.
हेही वाचा...उदयनराजे पुन्हा होणार खासदार.. आजच भाजप प्रवेश केलेल्या सिंधियांनाही राज्यसभेची उमेदवारी जाहीर
दरम्यान, विरोधी पक्षनेते दरेकर यांचे अर्थसंकल्पावर भाषण सुरू असताना त्याचे थेट प्रक्षेपण होत नसल्याची बाब भाजपचे सदस्य सुजितसिंह ठाकूर यांनी सभापतींच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळेही दरेकर यांनी सरकारवर तोफ डागली. सरकारकडून विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांना दिलेले अधिकृत निवासस्थान काढून घ्यायचे, विरोधकांना सभागृहात बोलू द्यायचे नाही. तसेच विरोधी पक्षनेत्यांचे खाजगी सचिव यांच्या नियुक्तीमध्ये हेतूपुरस्सपणे अडथळे आणण्याचे प्रकार सरकारकडून होत आहेत. विरोधकांना देण्यात येणारी वागणूकही राजकीय सूड भावनेने प्रेरित असल्याचा आरोप दरेकर यांनी केला.