मुंबई -शिवसेनेचे बंडखोर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट तसेच भाजपने आज विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीचा त्यांचा पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे. पण, उद्या शिंदे-फडणवीस सरकारला बहुमत चाचणीचा दुसरा महत्त्वाचा टप्पा पार करावा लागणार आहे. याबाबत आज शिंदे गटाच्या आमदारांची तसेच भाजपच्या आमदारांची संयुक्त बैठक मुंबईतील ताज प्रेसिडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी संबोधित केले.
बेसावध राहू नका, चूक करू नका?आज विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये शिंदे गट तसेच भाजप यांच्या आमदारांची संख्या 164 आहे. भाजपचे दोन आमदार मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप हे आजारी असल्याने उपस्थित राहू शकले नाही. भाजप-शिंदेगटकडे सध्या 166 आमदारांचा आकडा आहे. आजारी असलेले दोन्ही आमदार उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईत येण्याची शक्यता आहे. मात्र, बहुमतासाठी जो आकडा पाहिजे त्याच्यापेक्षा शिंदे- भाजपगटाचे संख्याबळ जास्त आहे. उद्या कशा पद्धतीने मतदानाला सामोरे जायचे या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी युतीच्या सर्व आमदारांना मार्गदर्शन केले. मतदानाबाबत सावधगिरी बाळगण्याचा इशाराही देवेंद्र फडवणीस यांनी सर्व आमदारांना दिला आहे.
हेही वाचा -Meeting of BJP National Executive: पंतप्रधानांची 'KCR' यांच्यासह घराणेशाहीवर जोरदार टीका
आमदार आमच्या संपर्कात, मग कुठे गेले आमदार?शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर अगोदर सुरत, गुवाहाटी, नंतर गोवा असे पर्यटन करायला गेलेल्या शिवसेनेच्या ३९ आमदारांपैकी १५ ते २० आमदार आमच्या संपर्कात आहेत असे, शिवसेनेकडून सांगितल जात होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे वारंवार शिवसेनेचे बंडखोर आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगत होते. याचा खुलासा आज खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात करत केला. जे आमदार त्यांच्यासोबत होते त्यांनी मला सांगितले असते तर, मी त्यांना विशेष चॅटर्ड विमानाने मुंबईत पाठवले असते, असे शिंदे विधानसभेत म्हणाले. यावरून हे सिद्ध झाले की, शिंदेगटाबरोबर गेलेला शिवसेनेचा एकही आमदार शिवसेना नेत्यांच्या संपर्कात नव्हता. म्हणून आज विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत शिंदे-फडणवीस युती सरकारला १६४ हा बहुमताचा आकडा गाठता आला. यावरून आता उद्या चाचणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.