मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या इमारतीच्या काही अंतरावर 25 फेब्रुवारी रोजी सापडलेल्या हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास केला जात आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती आणखी एक सीसीटीव्ही फुटेज लागले आहे. स्कॉर्पिओ पार्क करण्यापूर्वी सचिन वाझे, विनायक शिंदे व काही इतर संशयितांची बैठक मीरा रोड, वसईमधील दोन वेगवेगळ्या फार्महाऊसवर झाल्याचं या फुटेजमधून स्पष्ट झाल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला आहे.
बैठकीत वाटून देण्यात आली कामे
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरव्या रंगाच्या स्कॉर्पियो गाडीत जिलेटीनच्या कांड्या कोणी आणायच्या? गाडी मुंबईत दाखल करताना कुठली नंबर प्लेट वापरायची? याबरोबरच वेगवेगळ्या क्रमांकाच्या नंबर प्लेट कुठून आणायच्या? त्या कोणी बनवून आणायच्या? यासंदर्भातील कामाची वाटणी या बैठकीदरम्यान करण्यात आलेली होती.
'त्या' व्यक्तिंनाही लवकरच एनआयएचे समन्स!
या बैठकीमध्ये सचिन वाझे व विनायक शिंदे या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे म्हणने आहे. आतापर्यंत सचिन वाझेंकडून मिळालेल्या माहितीवरून अँटिलिया इमारतीजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या संदर्भात केवळ सचिन वाझेच नाही तर आणखीन काही व्यक्ती सहभागी असल्याचं राष्ट्रीय तपास यंत्रणेचे म्हणने आहे. या संशयित व्यक्तींना लवकरच राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशीसाठी समन्स बजावले जाणार आहे.