महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वंदे भारत अभियान : विविध देशांतून मुंबईत परतले २४२३ भारतीय; १,१२८ नागरिक क्वारंटाईन, परदेशी भारतीयांसाठी अधिकाऱ्यांची फौज

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतात लॉकडाऊन असल्याने परदेशात भारतीय अडकले आहेत. त्यांना वंदे भारत मिशन अंतर्गत भारतात आणले जात आहे. मुंबई विमानतळावर शनिवार सायंकाळपर्यंत १७ विमानांतून २४२३ भारतीय नागरिक दाखल झाले आहेत. त्यापैकी ९०६ प्रवासी मुंबईतील, ११३९ महाराष्ट्रातील तर इतर राज्यातील ३७८ प्रवासी आहेत. यापैकी १,१२८ नागरिकांना ४३ हॉटेल्स्‌मध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Vande Bharat Abhiyan
वंदे भारत अभियान

By

Published : May 24, 2020, 9:57 AM IST

मुंबई - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या भारतीयांना वंदे भारत मिशन अंतर्गत भारतात आणण्यात येत आहे. मुंबई विमानतळावर शनिवार सायंकाळपर्यंत १७ विमानांतून २४२३ भारतीय नागरिक दाखल झाले आहेत. त्यापैकी ९०६ प्रवासी मुंबईतील, ११३९ महाराष्ट्रातील तर इतर राज्यातील ३७८ प्रवासी आहेत. यापैकी १,१२८ नागरिकांना ४३ हॉटेल्स्‌मध्ये क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. येत्या दिनांक ७ जूनपर्यंत आणखी १३ विमानांनी विदेशातील भारतीय नागरिक परतणार आहेत. परदेशातून आलेल्या भारतीयांसाठी राज्य आणि पालिका अधिकाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे.

परदेशी भारतीयांसाठी अधिकाऱ्यांची फौज -

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतात लॉकडाऊन असल्याने परदेशात भारतीय अडकले आहेत. त्यांना वंदे भारत मिशन अंतर्गत भारतात आणले जात आहे. या मिशनअंतर्गत मुंबईत विशेष विमानांनी परतणाऱ्या नागरिकांसाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासनाने उपाययोजना केली आहे. त्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, महसूल विभाग, पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ, बेस्ट प्रशासन आणि मुंबई विमानतळ या सर्व यंत्रणा समन्वयाने कामकाज करत आहेत. यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरिकर यांच्या मार्गदर्शनाने अपर जिल्हाधिकारी विवेक गायकवाड, अपर जिल्हाधिकारी उद्धव घुगे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांची स्थापना करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी पद्माकर रोकडे व उमेश बिरारी यांच्यासह प्रत्येक पथकामध्ये १५ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. बृहन्मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलीन सावंत, संचालक (भूसंपादन) अनिल वानखडे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) भैयासाहेब बेहरे यांच्यासमवेत सुमारे ५० अधिकारी -कर्मचारी यांचे पथक दररोज यासंदर्भातील अंमलबजावणीवर देखरेख ठेवत आहेत.

अशी केली जातेय कार्यवाही -
केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करुन विशेष विमानांनी परत येणाऱ्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रारंभी क्वारंटाईन केले जात आहे. प्रामुख्याने इतर जिल्ह्यातील व इतर राज्यातील प्रवासी यांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. इतर जिल्हे व राज्यातील नागरिकांना त्यांचे संबंधित जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांच्यामार्फत क्वारंटाईन केले जाणार आहे. इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईत क्वारंटाईन केले जात आहे. वाहतूक परवाना संबंधित राज्याकडून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येणार आहे. बृहन्मुंबईतील रहिवासी असलेल्या प्रवाशांसाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची सुविधा म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने ८८ हॉटेलमध्ये मिळून ३,३४३ कक्ष आरक्षित केले आहेत.

विमानतळावर कशी होते कार्यवाही -
प्रारंभी विमानतळावर आलेल्या प्रवाशांचे विमानतळ यंत्रणेमार्फत तपासणी (स्क्रीनिंग) करण्यात येते. त्यानंतर महसूल विभागनिहाय उपलब्ध असलेल्या टेबलवर जाऊन प्रवाशांना वाहतूक परवाना (ट्रॅव्हल पास) दिला जातो. हा परवाना घेऊन द्वार क्रमांक ४ येथे प्रवासी येतात. तेथून प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी वाहने पुरवतात. तर बृहन्मुंबईतील नागरिकांना बेस्ट बसेसमार्फत रवाना केले जाते. महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळदेखील बसेस पुरवत आहे.

इतके परतले भारतीय -
दिनांक १० मे रोजी लंडन येथून ३२६, सिंगापूरहून २४३ आणि मनिला येथून १५० नागरिक परतले. ११ मे रोजी सॅनफ्रान्सिको येथून १०७ आणि ढाका येथून १०७ जण आले. दिनांक १२ मे रोजी न्यू यॉर्क येथून २०८ तर क्वालालम्पूर येथून २०१ नागरिक परतले. दिनांक १३ मे रोजी शिकागो येथून १९५, लंडन येथून ३२७ तर कुवेत मधून २ जण आले. दिनांक १७ मे रोजी अदिस अबाबाहून ७८ तसेच काबूल येथून १२ जणांचे आगमन झाले. दिनांक १८ मे रोजी मस्कत येथून १६ जण, दिनांक १९ मे रोजी मनिला येथून ४१ जण मुंबईत आले. दिनांक २० मे रोजी मनिला येथून २९ प्रवासी, दिनांक २१ मे रोजी जकार्ता येथून १८५ प्रवासी तर काल २२ मे रोजी जोहान्सबर्गमधून १९६ जण मुंबई विमानतळावर उतरले आहेत.

या देशातून येणार नागरिक -
यापुढे दिनांक ७ जूनपर्यंत जकार्ता, जोहान्सबर्ग, लंडन, मनिला, टोकियो, कोलंबो, मॉरिशस, नैरोबी आदी विदेशातील ठिकाणांहून मुंबईत भारतीय नागरिक परतणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details