मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी ऑनलाईन कॅम्पेन करून देणगी मिळवण्यात वंचित बहुजन आघाडी सर्वात आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. तसेच राज्यात आम आदमी पार्टीच्या पारोमीता गोस्वामी यांना देणगीदारांनी सर्वाधिक पसंती दिली आहे.
ऑनलाईन कॅम्पेनद्वारे देणगी मिळण्यात 'वंचित' सर्वात आघाडीवर मागील काही वर्षांपासून 'अवर डेमोक्रसी' पोर्टलच्या माध्यमातून राजकीय पक्षांना ऑनलाइनद्वारे देणगी मिळवून देण्यात येते. यामध्ये वंचित बहुजन आघाडीने 15 लाखाहून अधिक निधी मिळवला असून, यासाठी देश-विदेशातील 1 हजार 335 समर्थकांनी देणग्या दिल्या आहेत. देशातील राजकीय पक्षांना देणगी मिळवून देण्यासाठी 'अवर डेमोक्रसी' पोर्टल कार्यरत आहे. या पोर्टलवर राज्यात वंचित बहुजन आघाडी सर्वाधिक निधी मिळवल्याची माहिती आहे.
आम आदमी पार्टीच्या उमेदवार व सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांनाही राज्यात सर्वात जास्त निधी मिळाला आहे या पोर्टलवर वंचितने 'तुमचा छोटा त्याग मोठा बदल घडवू शकतो' अशा विविध आशयाची घोषवाक्ये पोस्ट केली आहेत. तसेच 'वंचित सारे एक होऊ, सत्ता आपल्या हाती घेऊ' अशा प्रकारचे विविध मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये हे आवाहन केले आहे. या आवाहनाला 1 हजार 335 जणांनी दाद दिली असून, सर्वात जास्त देणगी देणाऱ्यांमध्ये डॉ.राजेंद्र डोंगरे यांचे नाव आहे. त्यांनी 2 लाख तसेच फारुख अहमद यांनी 2 लाख 40 हजार 400 रुपये जमा केले आहेत. याव्यतिरिक्त महेश कांबळे 1 लाख, प्रदिप ढवळे 1 लाख 11 हजार 111, ईश्वरचंद्र घरडे 1 लाख व सारिका सोनोने यांनी 51 हजार रुपयांची मदत वंचितला केली आहे.
ब्रम्हपुरी येथील आम आदमी पार्टीच्या उमेदवार व सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांना राज्यात सर्वात जास्त 3 लाख 53 हजार 187 रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती 'अवर डेमोक्रसी' पोर्टलच्या माध्यमातून मिळाली आहे.