मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी (BMC Election) वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) कंबर कसली आहे. या निवडणुकांसाठी राष्ट्रीय जनता दल (Rashtriya Janata Dal) आणि मुस्लिम लीगसोबत (Muslim League) आघाडी करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी घोषित केले आहे. आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या संदर्भात माहिती दिली. या सोबतच इतर सेक्युलर पक्षांसोबत आपण चर्चा करण्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर तसेच काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी 'एकला चलो' ची भूमिका घेतली असली तरी, आम्ही काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार आहोत. यावेळी शिवसेनेने देखील सोबत यायला हरकत नाही म्हणत मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेसोबतही चर्चा करण्याची तयारी प्रकाश आंबेडकर यांनी दाखवली आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एमआयएम पक्षासोबत आघाडी करणार नसल्याचे देखील यावेळी आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
- आमच्याबाबत काँग्रेसच्या मनात भीती-
प्रत्येक निवडणुकांच्या आधी काँग्रेससोबत जाण्यासाठी आम्ही चर्चा करत असतो. मात्र जागांच्या वाटपावरून शेवटच्या क्षणी आघाडीची चर्चा फिस्कटते. काँग्रेसचे उमेदवार ज्या जागांवर निवडून येऊ शकत नाही अशा जागांची आम्ही मागणी करतो. त्या जागा आम्ही जिंकतो. तसेच काँग्रेस हरणाऱ्या जागा आम्ही सहज जिंकतो म्हणूनच काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीबद्दल भीती वाटते, असा चिमटाही प्रकाश आंबेडकर यांनी काढला.
- निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार संविधानात नाही-
ओबीसी समाजाला मिळणारे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्थगित करण्यात आले. मात्र, ओबीसी समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. पण निवडणुका पुढे ढकलण्यात याव्या अशी कोणतीही तरतूद संविधानामध्ये नाही. त्यामुळे उच्च आणि सर्वोच्च न्यायालय जे निकाल देत आहेत ते घटना विरोधी आहेत. वेळोवेळी कोविडच्या नावाखाली निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. मात्र आणीबाणी घोषित झाली असली तरी, निवडणुका घ्याव्या लागतात, असे प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.