मुंबई -दिल्लीतील शाईन बागच्या धर्तीवर राज्यात किसान बाग आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे. आज दिवसभर राज्यात आंदोलन चालू झाले आहे. मात्र मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबई पोलिसांनी रात्रीपासूनच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. आघाडीच्या प्रमुख नेत्या रेखा ठाकूर यांनासुद्धा नागपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नागपाडा येथे आंदोलन होणार होते.
'आमच्या कार्यकर्त्यांची धरपकड'
केंद्र सरकारने पारित केलेला कृषी कायदा रद्द व्हावा, यासाठी दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीतर्फे राज्यात किसान बाग आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. आम्ही मुंबईत शांततामय मार्गाने आंदोलन करणार होतो, मात्र पोलिसांनी आम्हाला परवानगी नाकारली आणि आज आमच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. महाविकास आघाडीचा घटक असलेल्या राष्ट्रवादीने राज्यसभेमध्ये हे काळे कायदे पारित होण्यासाठी गैरहजर राहून सहकार्य केले होते, अशी टीका त्यांनी केली.
वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध
नागपाडा येथे आंदोलन होणार होते. या भागात अनेक रस्ते बंद करण्यात आले असून अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे अशाप्रकारे कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या या आघाडी सरकारचा वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध करण्यात येत आहे.