मुंबई- मुंबईमधील दादर हे सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. या परिसरात नेहमीच गर्दी असते. सणासुदीला दादर पश्चिमेकडे पाय ठेवायलाही जागा नसते. अशा गर्दीच्या ठिकाणी वाहन पार्किंग करणे डोकेदुखी ठरते. ही समस्या दूर करण्यासाठी आता येथे 'वॅलेट' पार्किंगची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. व्यापारी संघ व महापालिकेने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. पार्किंगसाठी चार तासांसाठी १०० रुपये तर पुढील एक तासासाठी २५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत ही सुविधा असणार आहे. त्यामुळे आता वाहन पार्क करून शॉपिंग आदी कामे बिनधास्त करता येणार आहे.
वॅलेट पार्किंग -दादर पश्चिम परिसर नेहमीच गर्दीने गजबजून गेलेला असतो. मध्यवर्ती ठिकाण तसेच नाट्य, सिनेमागृह, विविध प्रकारची चवदार पदार्थांची हॉटेल्स व मुख्य म्हणजे विविध वस्तूंसाठी फेमस असलेला बाजार, लगीन सराई व सणासुदीच्या खरेदीसाठी होणारी गर्दी या परिसरात असते. अशा गर्दीच्या ठिकाणी पाय ठेवायला जागा नसतो. त्यामुळे वाहन चालकांना वाहन पार्किंग करण्यासाठी जागाच शिल्लक राहत नाही. ही बाब लक्षात घेऊन महापालिका व व्यापारी संघाने येथे वॅलेट पार्किंग ( Pay and Park )ची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. दादर व्यापारी संघातर्फे ऑगस्ट ते दिवाळीमध्ये अशी पार्किंग योजना राबविण्यात आली होती. त्यास नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ही योजना राबविण्यात येणार आहे. प्लाझा चित्रपटगृहाजवळ या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे येथील चवदार हॉटेलमधील पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल, नाटक, सिनेमा तसेच बाजारात खरेदी व अन्य स्थळांना भेटी द्यायच्या असल्यास आपले वाहन येथील पार्किंगमध्ये पार्क करून बिनधास्त फिरता येणार आहे. चार तासासाठी १०० रुपये व त्यापुढील एका तासासाठी २५ रुपये मोजावे लागणार आहे.