मुंबई-लॉकडाऊन काळामध्ये रस्ते, फुटपाथ आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब लोकांचे दोन वेळच्या जेवणासाठी प्रचंड हाल झाले. अशा लोकांच्या मदतीसाठी शहरातील सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. पण जसजसे लॉकडाऊन शिथिल करण्यात आले, तशी अनेकांनी मदत देखील थांबवली. मदत बंद झाल्याने या लोकांचे पुन्हा हाल सुरू झाले आहेत. अशा नागरिकांच्या मदतीसाठी मुंबईतील ऍड. वैभव थोरात यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या १३ महिन्यांपासून मुंबईतील गरिबांची भूक शमवण्याचे काम ते करत आहेत. आतापर्यत ४० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना त्यांनी मदत केली आहे.
ताजे आणि पौष्टिक जेवण
लॉकडाऊनच्या काळामध्ये बेघर, गरिबांचे अन्नावाचून हाल होत असल्याच्या अनेक बातम्या प्रसिद्ध होत होत्या. त्यातच रस्त्यावरील मुलांना भुकेने व्याकुळ होताना पाहिल्यानंतर या मुलांसाठी काहीतरी करावे, असा विचार वैभव यांच्या मनात येऊ लागला. त्यातूनच रस्त्यावर राहणाऱ्यांना किमान एक वेळचे जेवण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यासाठी वैभव यांनी एक किचन सुरू केले. किचन सुरू करण्यासाठी पालिकेकडून आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्या. या किचनमधून त्यांनी दररोज रात्री 100 लोकांना ताजे आणि पौष्टिक जेवण पुरविण्यास सुरुवात केली. दररोज रात्री 8 च्या सुमारास गाडीमध्ये जेवणाच्या प्लेट भरून, मुंबईच्या रस्त्यावर वैभव निघतात, भायखळापासून कधी दक्षिण मुंबईच्या दिशेने, कधी पूर्व उपनगर तर पश्चिम उपनगराच्या दिशेने त्यांचा हा प्रवास सुरु झाला आहे. रस्त्यामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक गरीब, फुटपाथवर झोपणाऱ्या व्यक्तीला ते जेवणाचे ताट देतात. यामध्ये लहान मुलांपासून वयोवृद्धांची संख्या अधिक असते. अनेकदा जेवण वाटप करत असताना त्यांच्याकडील जेवण कमी पडायचे, तर भुकेल्यांची संख्या अधिक असायची हे पाहून मन हेलावून जात असल्याचे वैभव यांनी सांगितले.
मित्रांची वैभवाला मदत