मुंबई- चीन आणि पाकिस्तानचा धोका ओळखून भारताने आता नौदलाचे सामर्थ्य वाढविण्यावर भर दिला आहे. यासाठी अत्याधुनिक विनाशिकांबरोबरच पाणबुड्यांची निर्मिती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून प्रोजेक्ट 75 अंतर्गत बांधण्यात आलेली ‘आयएनएस वागशीर’ या पाणबुडीचे ( Submarine ) माझगाव डॉकयार्डमध्ये समारंभपूर्वक जलावतरण रविवारी (दि. 20 एप्रिल) संरक्षण सचिव अजय कुमार यांच्या हस्ते केले गेले. ही पाणबुडी 40 टक्के देशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात अत्याधूनिक नेव्हीगेशन यंत्रणा बसवण्यात आली आहे. वागशिर ही 50 दिवस पाण्याखाली राहू शकते. तर यातील क्षेपणास्त्र शत्रुचा अचूक वेध घेण्यास सक्षम आहेत. ही पाणबुडी नौदलात दाखल झाल्याने हिंद महासागरात भारताचा दबदबा वाढणार आहे.
पाणबुडी भारतीय नौदलाची गरज- भारतीय नौदलाला अत्याधुनिक पाणबुड्यांची गरज आहे हे लक्षात आल्यानंतर इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना हा प्रकल्प आकारास आला. या अंतर्गत खरे तर एकूण 24 पाणबुड्यांची निर्मिती करणे सुरुवातीस प्रस्तावित होते. मात्र, नंतर ही संख्या फक्त 4 आणि नंतर 5 वर आली. पाणबुडी ही नौदलाची गोपनीय नजर असते. त्यामुळे पाणबुडी विभागाला नौदलात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाणबुडी समुद्राच्या पृष्ठभागावर येऊन तसेच समुद्राखालूनही हल्ला करू शकते. अधिक संख्यने आणि सक्षम पाणबुड्या असणे म्हणूनच नौदलासाठी महत्त्वाचे असते.
या अगोदरच्या पाणबुड्या..? -प्रकल्प 75 अंतर्गत एकूण सहा पाणबुड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या सर्व कलवरी वर्गातील पाणबुड्या आहेत. या अगोदर कलवरी वर्गातील आयएनएस कलवरी आणि आयएनएस खंदेरी या दोन्ही पाणबुड्या अनुक्रमे 21 सप्टेंबर, 2017 आणि 10 सप्टेंबर, 2019 रोजी भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल झाल्या. त्यानंतरच्या पाणबुडी आयएनएस करंज 10 मार्च, 2021 तसेच आयएनएस वेला 25 नोव्हेंबर, 2019 रोजी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाल्या. पाचवी पाणबुडी वागीर सध्या सागरी चाचण्यांमध्ये असून 2022 च्या वर्षाखेरीस ती भारतीय नौदलात दाखल होणे अपेक्षित आहे. सहावी पानबुडी असलेल्या वागशीरचे जलावतरण आज झाले आहे.