मुंबई -भारतातील दोन औषध कंपन्यांची कोविड प्रतिबंधक लस अंतिम टप्प्यात असून केंद्राने निर्देश दिल्यास जानेवारीत लसीकरणाला सुरुवात होऊ शकते. तसेच केंद्राने राज्यांना लस मोफत द्यावी, अशी अपेक्षा असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते. देशातील सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांची लस अंतिम टप्प्यात असून या कंपन्यांनी लसी करिता परवानगी मागितली आहे. केंद्राने निर्धारित केलेल्या सूचनांचे पालन करून अतिशय मायक्रो लेव्हल वर लसीकरण केले जाईल, असे टोपे म्हणाले.
आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा लस-
राज्यात अत्यावश्यक सेवेत असलेले कर्मचारी , पोलीस आणि आरोग्य सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा लस देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 1 लाख कर्मचाऱ्यांना केंद्राच्या निर्देशानुसार लस देण्यात येईल. त्यासाठी लसीचा साठा करण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी विभागवार शितगृहाची उभारणी करण्यात येत आहे.
नागरिकांची विभागणी करून लसीकरण कार्यक्रम-
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 50 वर्ष वयावरील नागरिक, इतर आजार असलेले 50 वर्ष वयावरील नागरिक तसेच वय वर्ष साठ आणि त्या पुढील नागरिक, अशी वर्गवारी करून लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.