मुंबई- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी (दि. ६ डिसेंबर) अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांनी वाहिलेल्या ७५० किलो फुलांपासून पालिका खत बनवणार आहे. तसेच अभिवादन करण्यासाठी आलेल्या ७५४ अनुयायांना कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
७५४ जणांचे लसीकरण -
मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यातच ओमायक्रॉन हा विषाणूचा नवीन व्हेरियंट समोर आला आहे. या व्हेरियंटचे रुग्ण राज्यात आढळून आल्याने दादर चैत्यभूमी येथे येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांचे लसीकरण आणि कोविड चाचण्या करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. मुंबईत आलेल्या अनुयायांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पालिकेने ५ व ६ डिसेंबर, असे दोन दिवस आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली होती. पालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे लसीकरणासाठी चैत्यभूमी परिसरात लसीकरण बूथ उभारले होते. या बूथच्या माध्यमातून ५ आणि ६ डिसेंबरला ७५४ जणांचे लसीकरण केले. यात २९८ जणांना पहिला डोस तर ४५६ जणांना दुसरा डोस देण्यात आला.