मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु आहे. लसीचा तुटवडा असल्याने नागरिकांना दुसरा डोस मिळत नसून नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांचे लसीकरण करण्यासाठी लसीकरण केंद्रावर वॉक इन पद्धतीने लसीकरण केले जाणार आहे. सोमवार ते बुधवार असे लसीकरण केले जाणार असल्याचे परिपत्रक पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी काढले आहे.
नव्या मार्गदर्शक सूचना -
मुंबईत १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू झाले. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, ६० वर्षांवरील नागरिक, ४५ वर्षांवरील सहव्याधी असणाऱ्यांचे लसीकरण सुरू केल्यानंतर १ मेपासून १८ वर्षांवरील वयोगटासाठीही लसीकरण सुरू आहे. मात्र लसींचा तुटवडा असल्याने लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे. यामध्ये अनेकांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस वेळेत मिळेल का याची चिंता आहे. तर दुसरीकडे नोंदणीसाठी अॅपचा गोंधळ कायम आहे. मुंबई महापालिकेने ज्येष्ठ व दिव्यांगांसह दुसरा डोसच्या लाभार्थ्यांना दिलासा दिला आहे. पालिका, सरकारच्या ३९ आणि ७३ खासगी केंद्रांवर लसीकरण करण्यात आले होते. मात्र सद्यस्थितीत पुरेसे डोस मिळत नसल्याने बहुतांशी खासगी केंद्रे बंद करण्यात आली. त्यामुळे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. जेष्ठ नागरिक व दिव्यांगांना सोमवार ते बुधवार नोंदणी न करता थेट केंद्रावर जाऊन लस घेता येणार आहे. तर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस केंद्रांवर १०० टक्के लसीकरण नोंदणीनेच केले जाणार आहे.