मुंबई -लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना येत्या स्वातंत्र्य दिनापासून म्हणजेच, १५ ऑगस्ट २०२१ पासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यास मुभा देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मात्र, या लसवंतांना लोकलचे एक दिवसीय तिकीट मिळणार नाही. तर, त्यांना एका महिन्याचे पास देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे लसवंतांमध्ये राज्य सरकारविरोधात प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रवाशांनी व्यक्त केला संताप-
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना येत्या १५ ऑगस्टपासून उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आले आहे. त्यानुसार, नागरिकांना लोकल रेल्वे प्रवास करणे सोयीचे व्हावे, त्यांना मासिक रेल्वे प्रवास पास मिळावा, यासाठी कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची ऑफलाइन पडताळणी प्रक्रिया आजपासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ५३ रेल्वे स्थानकांवर तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर रिजन) १०९ स्थानकांवर सुरू झाली आहे. त्यानुसार, पहिल्याच दिवशी एकूण १८ हजार ३२४ रेल्वे प्रवाशांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. १७ हजार ७५८ मासिक पास देण्यात आले आहेत. मात्र, पडताळणी पूर्ण झालेल्या लसवंत प्रवाशांना लोकलची एक दिवसीय तिकीट नाकारले आहे. महिन्यांतील काही दिवसांचा प्रवास करायचा असल्यास एका महिन्याचा पास काढायचा का, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला आहे.