मुंबई -शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. 13 जानेवारी) उत्तर प्रदेशात जाऊन शेतकरी नेते राकेश टिकेत यांची भेट ( Sanjay Raut Meets Rakesh Tikait ) घेतली. अन्य काही नेत्यांनाही आपण भेटणार असून शिवसेना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ( Uttar Pradesh Assembly Election 2022 ) 50 ते 100 जागा लढविण्याचा विचार करीत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात शिवसेनेची ताकद किती आहे हे सर्वांनाच माहीत आहे. उत्तर प्रदेशात शिवसेना जागा जिंकू शकणार नाही. मात्र, शिवसेना काही जागांवर नक्कीच प्रभाव टाकू शकेल आणि सत्ताधारी भाजपला अडचणीत आणू शकेल एवढे मात्र नक्की. याचे कारण हिंदुत्व हा शिवसेनेचा असलेला नारा. भाजपाचे हिंदुत्व हे बेगडी आणि सोयीचे असल्याचा दावा करत शिवसेनेचे हिंदुत्व हेच खरे हिंदुत्व आहे आणि बाबरी मशिदीचा ढाचा शिवसैनिकांनीच पाडला होता, याची वारंवार आठवण करत संजय राऊत आपल्या हिंदुत्वाचा पाया अधिक घट्ट करीत आहेत. यामुळे हिंदुत्ववादी विचारांच्या मतदारांचा बुद्धीभेद होऊन त्याचा फायदा काही प्रमाणात काँग्रेसला आणि समाजवादी पक्षाला अधिक होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचा हिंदुत्वाशी काय संबंध ? -हिंदुत्वाचे आणि शिवसेनेचे काय देणे घेणे आहे. शिवसेनेचे हिंदुत्व हे तकलादू हिंदुत्व आहे. सातत्याने हिंदू आतंकवाद, भगवा आतंकवाद, अशी ओरड करणाऱ्या काँग्रेसच्याचरणी शिवसेनेने आपले हिंदुत्व सोपवले आहे. हिंदुत्वाचा दाखला देताना शिवसेना नेहमी बाबरी मशिदीचा ढाच्या पाडल्याचा दाखला देते. मात्र, त्याच्याशीही त्यांचा संबंध नाही, असा दावा भाजपा नेते पवन त्रिपाठी ( BJP Leader Pawan Tripathi ) यांनी केला आहे. आधी मंदिर मग सरकार म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरासाठी चालवण्यात आलेल्या निधी संकलन अभियानाला विरोध दर्शवला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम मंदिराचा भूमिपूजन करायला जात असताना कोविड काळात भूमिपूजनाची काय गरज, असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे यांना ना रामाशी देणे-घेणे आहे, ना हिंदुत्वाशी. त्यामुळे शिवसेनेचा डाव उत्तर प्रदेशातील जनता ओळखेल, अशी प्रतिक्रिया त्रिपाठी यांनी व्यक्त केली आहे.