मुंबई -अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची माहिती आहे. त्यांनी यासंदर्भात टि्वट करून माहिती दिली. काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या आणि निवडणुकीनंतर काँग्रेसला रामराम ठोकणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेकडून विधान परिषदेसाठीही उर्मिला मातोंडकर यांचे नाव राज्यपालांकडे पाठवण्यात आले आहे.
उर्मिला मातोंडकर यांनी 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना भाजपाच्या गोपाळ शेट्टींकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. निवडणुकीनंतर त्यांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला होता. दरम्यान, राजकारणातून दूर राहिल्यानंतर वर्षभरानंतर त्या पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार आहेत.