मुंबई- भारताच्या सर्वोच्च सन्मानापैकी एक सन्मान म्हणून पद्मभूषण पुरस्काराकडे पाहिले जाते. यावर्षी यूपीएल ग्रुपचे सीएमडी रजनीकांत देविदास श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. श्रॉफ यांना त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रातील कामागिरीबरोबरच कृषी, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
युनायटेड फॉस्फरस लिमिटेड या कंपनीची स्थापना-
गुजरातमधील कच्छ येथे 1934 साली एका छोट्या गावात रजनीकांत यांचा जन्म झालेला होता. केमिस्ट्री बद्दल नेहमीच कुतूहल असलेल्या रजनीकांत यांना भारतातील रेड फॉस्फरसच्या उत्पादन क्षेत्रातील प्रमुख म्हणून ओळखले जाते. 1956 पासून त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केलेली होती. रजनीकांत श्रॉफ हे राजू श्रॉफ या नावाने सुद्धा ओळखले जात होते. मुंबईतील खालसा कॉलेज येथुन बीएससी मध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित व्यवसाय करण्यास सुरुवात केली. युनायटेड फॉस्फरस लिमिटेड या कंपनीची स्थापना त्यांनी केली व त्यानंतर या क्षेत्रामध्ये यशाची एक एक पायरी चढत गेले.
कापड उत्पादनापासून 'रेड फॉस्फरस केमिकल'च्या उत्पादनापर्यंत वाटचाल-
सुरुवातीला कुटुंबाच्या कापड उत्पादन क्षेत्रात काम करत असताना रजनीकांत यांचे वडील देविदास भाई यांनी पेन बाम , हेअर ऑईलचे उत्पादन घेणारी कंपनी सुरू केली. त्यानंतर याच कंपनीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागात रजनीकांत श्रॉफ यांनी त्यांच्या वडिलांसोबत मिळून काम करण्यास सुरुवात केली.
इंग्लंडमध्ये स्थापली कंपनी-
1956 च्या काळामध्ये युरोप खंडात मर्क्युरीक क्लोराइड केमिकलला सर्वाधिक मागणी होती. त्यामुळे इंग्लंडमध्ये मर्क्युरी क्लोराईड केमिकलचे उत्पादन घेणारी कंपनी रजनीकांत श्रॉफ व त्यांच्या वडिलांनी स्थापन केली. जिथे रजनीकांत श्रॉफ यांनी सलग दोन वर्षे यशस्वीरीत्या ही कंपनी लंडनमध्ये चालवली. त्यानंतर हीच कंपनी विकून पुन्हा भारतात येऊन त्यांनी याच क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.
सामाजिक कार्यात हातभार-
रजनीकांत श्रॉफ व त्यांची पत्नी सॅन्ड्रा श्रॉफ यांनी व्यवसायासोबत सामाजिक कार्यातही आपला हातभार लावलेला आहे. गुजरातमधील आदिवासी भागात श्रॉफ कुटुंबीयांकडून वापी येथे सॅन्ड्रा बेन श्रॉफ ज्ञान धाम शाळा, श्रॉफ रोटरी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी अंकलेश्वर, श्री. जी. एन. बीलाखीया कॉलेज ऑफ फार्मसी वापी, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज वापी सारख्या अनेक शैक्षणिक संस्था सुरू केलेले आहेत.
आतापर्यंत रजनीकांत श्रॉफ यांना अॅग्रो लाइफ टाईम अॅचिव्हमेंट अॅवॉर्ड 2015 लंडन येथे पुरस्कार मिळाला होता, त्या बरोबरच रोलटा कॉर्पोरेट अॅवॉर्ड 2010 , इंडियन केमिकल कौन्सिल लाइफ टाईम अॅचिव्हमेंट अवॉर्ड 2010 , लाईफ टाइम अॅचिव्हमेंट अॅवॉर्ड 2018, अॅवॉर्ड टेक्नॉलॉजी 1972 असे पुरस्कार मिळाले आहेत. त्यानंतर यंदा त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.