मुंबई - वाहतुकीचे नियम वारंवार मोडणार्या बेशिस्त वाहनचालकांना लगाम लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून आता अशा बेशिस्त वाहनचालकांचा वाहन चालवण्याचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवण्यात आला आहे.
चारहुन अधिक वेळा उल्लंघन नको
सुरुवातीच्या टप्प्यात वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 2000 वाहनचालकांचे परवाने वाहतूक पोलिसांकडून हेरण्यात आले असून 4पेक्षा अधिक वेळा या वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांचे परवाने रद्द का केले जाऊ नयेत, अशा प्रकारची नोटीसही त्यांना धाडण्यात आली आहे.
ई-चलन अस्तित्वात मात्र दंड भरला जात नाही
मुंबई शहरात ई-चलन प्रणालीनुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. शहरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून रस्त्यावर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना हेरून त्यांना ई-चलन त्यांच्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात येत आहे. मात्र या माध्यमातून दंड भरणाऱ्या वाहनचालकांचा आकडा हा कमी असून बेशिस्त वाहन चालकांकडून ई-चलनद्वारे दंड वसूल होत नसल्यामुळे अशा प्रकारची कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात आहे.
310 कोटींचा दंड वसूल
वाहतूक विभागाचे सहआयुक्त यशस्वी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 318 कोटी रुपयांचा दंड मुंबई वाहतूक पोलिसांनी वसूल केला असून यामध्ये सर्वाधिक दंड हा दुचाकी वाहन चालकांना आकारण्यात आला आहे. यात ट्रिपल सीट, विना हेल्मेट, सिग्नल मोडणे वेग मर्यादा उल्लंघन करणे यांसारख्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे.