नागपूर - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची प्रकृती बरी होऊन त्यांनी जनतेच्या सेवेत लवकर रुजू व्हावे, अशी सदिच्छा भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीरावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली. ते कोराडी येथे माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री सक्रिय नसल्याचे उपस्थित नसणे यात नवीन काही नाही, पण मुख्यमंत्री झाले तेव्हापासून राज्यातील किती संकटकालीन परिस्थितीत दौरे केले, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर (Raosaheb Danve criticizes Uddhav Thackeray) निशाणा साधत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात परीक्षा घोटाळ्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, असेही रावसाहेब दानवे म्हणाले. दानवे यांनी संघमुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली व त्यानंतर ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी रवाना झाले. दरम्यान त्यांना पत्रकारांशी संवाद साधला.
पत्रकारांशी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तीन पक्षाच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कुठेही दिसत नाहीत -
दानवे म्हणाले की, मुख्यमंत्री हे सक्रिय नसणे हे काही पहिल्यांदा घडलेले नसून ते मुख्यमंत्री झाले तेव्हा पासूनच मंत्रालयात किती वेळा आले, राज्यावर आलेल्या किती संकटाना ते समोर गेले असे सवाल उपस्थित केले. अतिवृष्टी असो की पूर परिस्थितीत किती ठिकाणी दौरे केले. विकासाकामाचे प्रश्न असो की राज्या समोर येणाऱ्या मराठा आरक्षणाचा प्रश्न, ओबीसींचा किंवा इतर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असो मुख्यमंत्री कुठेही दिसून आलेले नाही. तीन पक्षाच्या सरकारमध्ये कुठल्या विषयावर एकमत होत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री हे कुठेही दिसत नाहीत, असाही आरोप करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
पंतप्रधानांनी त्यांच्या कार्यालयात बसून अधिवेशनात सहभाग -
देशाचे पंतप्रधान हे अधिवेशनात उपस्थित नव्हते असा आरोप केला जातो. यावर उत्तर देताना दानवे म्हणाले की, पंतप्रधान हे हाऊसमध्ये होते. यात पहिल्या दिवसांपासुन विरोधकांशी चर्चा करण्याची तयारी होती, फक्त गोंधळ घालू नये अशी मागणी होती. पण विरोधकांनी पहिल्या दिवसापासूनच गोंधळ घालायला सुरुवात केली असून आज शेवटच्या दिवशीही गोंधळ घालत अधिवेशन संपवलेले आहे. मतदार ओळखपत्र आधारशी जोडणे असो वर्षभरात चार वेळा मतदार यादीत नाव नोंदवण्याची संधी यात काही बदल करत निवडणूक पारदर्शक करण्याचा प्रयत्न होता. पण याला विरोध करण्याचे काम विरोधकांनी केले. त्यामुळे पंतप्रधान यांनी त्यांच्या कार्यलयात बसून कामकाज पाहत अधिवेशनात सहभाग घेतला, ते कधीही गैरहजर नसल्याचे दानवे यावेळी म्हणाले.
हैदराबादचे नाव बदलण्यात काही गैर नाही -
हैदराबाद येथे आरएसएसची एक बैठक होणार असून त्यासंदर्भात भाग्य नगरीत बैठक होणार असा उल्लेख करत ट्विट हे संघाच्या वतीने करण्यात आले होते. यावर प्रश्न विचारला असता हैदराबादचे नाव भाग्यनगरी करणार का, यावर बोलताना दानवे म्हणाले परकियांनी अनेक राज्यांवर आक्रमण केले. त्यावेळी हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदूंनी आपल्या भावनांचे रक्षण करण्यासाठी जर एखाद्या स्थळांचे नाव बदलण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यात गैर काहीही नाही, असेही दानवे म्हणाले. यात औरंगाबादचे नाव हे संभाजी नगर व्हावे हे आमची पूर्वीपासूनच मागणी असल्याचेही दानवेंनी सांगितले.
परीक्षांमधील भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करावी -
सध्या राज्यात परीक्षा घोटाळे गाजत आहेत, यावर बोलताना दानवे म्हणाले की भाजपची मागणी आहे यात सीबीआय चौकशी करण्यात यावी. हा भष्ट्राचार म्हणजे विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय आहे. पेपरफुटीचे प्रकरण म्हणजे फार मोठा भ्रष्टाचार आहे. याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. या टोळीचा पर्दाफाश करत यामागचा कर्ता करविता कोण, याचाही शोध सीबीआयच्या चौकशीतून झाला पाहिजे, असे भाष्य रावसाहेब दानवे यांनी केले.
अमर अकबर अँथोनीचे सरकार -
महाराष्ट्रातील तीन पक्षाचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून कुठलाही प्रयत्न केला जात नाही. हे तीन पक्षाचे अमर अकबर अँथोनीचे सरकार आहे. ते स्वतःच एकमेकांचे पायात अडकून पडतील. शिवसेना युपीएमध्ये जात आहे तर तो शिवसेना आणि युपीएचा प्रश्न आहे भाजपचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.