मुंबई - सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप सुरू असतांना, दुसरीकडे राजकीय वक्तव्य जोरदार होऊ लागले आहेत. काँग्रेसने विधानसभा आणि स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन 1 वर्ष सात महिने झाले असतांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. यावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाना पटोले आणि काँग्रेसला एक सल्ला दिला आहे.
'काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरावा'
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाना पटोले आणि काँग्रेसला सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, 'फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही, तर काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला पाहिजे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर तरलेले सरकार आहे. त्यामुळे जर काँग्रेसला मुख्यमंत्रीपद हवा असेल तर शिवसेना मुख्यमंत्री पद देण्यासाठी तयार होणार का? जर शिवसेनेने काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिले नाही तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावे', असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना केले.