महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ई टीव्ही भारत विशेष : एल्फिन्स्टन दुर्घटनेला 3 वर्षे पूर्ण; मुंबईत 'हे' आहेत धोकादायक पूल - Elphinstone bridge accident in Mumbai

एलफिन्स्टन दुर्घटनेच्या आठवणी आज कोणालाही नको आहेत. प्रत्यक्षात अशा धोकादायक पुलांची समस्या अजूनही सुटलेली नाही, हे वास्तव आहे.

एल्फिन्स्टन पूल
एल्फिन्स्टन पूल

By

Published : Sep 29, 2020, 2:46 PM IST

मुंबई -एलफिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला होता. अजूनही प्रत्यक्षदर्शी या दुर्घटनेला विसरू शकले नाहीत. मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न अजूनही सुटला नाही, याचा ईटीव्ही भारतने घेतलेला हा आढावा.

एलफिन्स्टन दुर्घटनेत वाचलेल्या मुंबईकरांना अजूनही ती आठवण भीतीदायक वाटते. त्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली. त्यांनी सैन्य दलाची मदत घेत नवा पूल उभारला. पण मुंबईत अनेक अरुंद पुल आहेत. वाहतुकीसाठी त्यांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात.

एल्फिन्स्टन दुर्घटनेला 3 वर्षे पूर्ण
दुर्घटना घडलेल्या एलफिस्टन रोड स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी करण्यात आले. मात्र तरीही एलफिन्स्टन रोड नावाचा उल्लेख झाला की, या पुलाच्या दुर्घटनेच्या आठवणी ताज्या होतात. टाळेबंदी असल्याने रेल्वे सामान्यांसाठी बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे स्थानकात व पुलांवर गर्दी दिसत नाही. दुर्घटनेच्या दिवशी श्रद्धांजली वाहण्यासाठी सरकार, प्रशासन व सत्ताधारी या ठिकाणी नाहीत. एरवी लोकल सुरू असताना मुंबईतील अनेक स्थानकात मोठ्या प्रमाणात अरुंद पुलांवर गर्दी दिसते. त्यासाठी अरुंद पुलांवर काम करत असल्याचे सरकारकडून दाखविण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात लोकल नेहमीसारखी सुरू झाली की, मुंबईतील रेल्वेस्थानकात अरुंद पुलावर व पादचारी पुलांवर गर्दी दिसते. पण एखादी दुर्घटना घडल्याशिवाय सरकारला जाग येत नाही, अशी स्थिती आहे.
एल्फिन्स्टन पूल



काय होती एल्फिस्टन दुर्घटना?

एल्फिस्टन दुर्घटना २९ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी ही दुर्घटना घडली होती. परळ ते एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाला जोडलेला हा पूल अरूंद असल्याने लोकांची गर्दी या पूलावर होती. सततधार पाऊस असताना पुलावर गर्दीत चेंगराचेंगरी झाली. घाबरलेल्या लोकांमध्ये गोंधळ उडाला. ही घटना घडली यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. या परिसरात रहिवाशांना सर्वप्रथम चेंगराचेंगरी होत असल्याची घटना अफवा वाटली होती. अशी घटना मुंबईने पहिल्यांदाच बघितली. मृत्युमुखी पडलेल्यांना सरकारने थोडीफार मदत केली. मात्र अनेकांच्या घरातील कर्ता व्यक्ती गमाविला होता. त्यामुळे आजही त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे. या घटनेनंतर गेल्या तीन वर्षांत एलफिस्टन ठिकाणी मोठे बदल झालेले आहेत. मात्र, मुंबईत असे अनेक अरुंद रेल्वे पूल आहेत. त्याठिकाणी दुर्घटना घडल्यावरच सरकार व प्रशासनाला जाग येईल का, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो.


मुंबईत आजही अरुंद व धोक्याचा परिस्थिती असलेले पूल

  1. महालक्ष्मी येथील रेल्वे उड्डाणपूल
  2. करी रोड स्थानक उड्डाणपूल
  3. शीव स्थानक रेल्वे उड्डाणपूल
  4. धारावी उड्डाणपूल
  5. टिळक उड्डाणपूल, दादर
  6. दादर फूल मार्केटजवळील पादचारी पूल
  7. माहीम फाटक पादचारी पूल
  8. दादर-धारावी नाल्यावरील पादचारी पूल
  9. ग्रँट रोड रेल्वे स्थानकावरील पूल
  10. ऑपेरा हाऊस पूल
  11. फ्रेंच पूल
  12. हाजीअली भुयारी मार्ग
  13. फॉकलंड रोड पूल
  14. प्रिन्सेस स्ट्रीट पूल
  15. चर्चगेट उत्तर भुयारी मार्ग
  16. ग्लोरिया चर्च उड्डाणपूल
  17. वाय ब्रिज उड्डाणपूल
  18. ईस्टर्न फ्री-वेला जोडणारा पूल
  19. एसव्हीपी रेल्वे पूल
  20. वाय. एम. उड्डाणपूल
  21. पी. डिमेलो पादचारी पूल
  22. डॉकयार्ड रोड पादचारी पूल
  23. चर्चगेट दक्षिण भुयारी मार्ग
  24. प्रभादेवी स्थानक पूल
  25. नाना फडणवीस पूल, वडाळा

मुंबईत अनेक स्थानकांत अरुंद पूल आहेत. तसेच लोकांच्या ये-जा करण्यासाठी रेल्वे स्थानक व मुख्य रस्त्यांना जोडणारे पादचारी पूल आहेत. हे पूल मुंबईत धोक्याच्या परिस्थितीत आहेत. यावर रेल्वे, महापालिका व राज्य प्रशासनाकडून पुलांचे लेखापरीक्षण झाल्याचे सांगण्यात येते. हे काम लवकरच होईल, असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात येते. मात्र, मुंबईत गोखले पूल, एलफिस्टन पूल अशा दुर्घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते हे वास्तव नाकारता येणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details