मुंबई -औषध व्यावसायिक उमेश कोल्हे ( Umesh Kolhe Murder Case ) यांची गळ चिरुन 21 जूनला हत्या करण्यात आली होती. कोल्हे यांच्या खूनामागे नूपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? याबाबत सखोल चौकशीअंती हा खून नुपूर शर्मा प्रकरणातूनच झाला असल्याचा खुलासा अमरावती पोलिसांनी केला आहे. याच प्रकरणात सतत नवनवीन खुलासे होत आहेत. त्यावरती आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. तरीदेखील त्याच्यामागे काही विदेशी ताकद आहे का?, याची सुद्धा चौकशी केली ( Umesh Kolhe Murder Case International Connection Inquiry ) जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.
विधानभवनाबाहेर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, उमेश कोल्हे यांची झालेली हत्या ही फार गंभीर घटना आहे. ज्या कारणाने त्यांना मारण्यात आलं, ते अतिशय निंदणीय आहे. या घटनेतील आरोपी त्याचबरोबर त्याचा मास्टरमाइंड हा पकडला गेला आहे. तरीसुद्धा याच्यामागे काही विदेशी ताकद आहे का? याची सुद्धा चौकशी होणार आहे. सुरुवातीला या प्रकरणाला दरोड्याचं कारण देण्यात आलं होतं. तशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या गेल्या होत्या. परंतु, या प्रकरणात अजूनही पूर्ण चौकशी करण्याची गरज असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
मुख्य आरोपीला पोलीस कोठडी -उमेश कोल्हे हत्या प्रकरणात शेख इरफान शेख रहीम हाच मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आज ( 3 जुलै ) पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा या दृष्टीने न्यायालयाने शेख इरफान शेख रहीम याला सात जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहे.
मुख्य आरोपीच्या संस्थेची होणार चौकशी - शेख इरफान शेख रहीम हा एका स्वयंसेवी संस्थेचा पदाधिकारी असल्याचे समोर आले. या संस्थेची देखील चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणासाठी या संस्थेच्या वतीने किंवा इतर कुठून शेख इरफान शेख रहीम याला आर्थिक पुरवठा झाला का? याचा तपास देखील केला जाणार आहे. या हत्या प्रकरणात वापरण्यात आलेल्या दुचाकी, एक कार देखील जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती कोल्हे कुटुंबीयांचे वकील पंकज तामने यांनी दिली आहे. या प्रकरणात कोल्हे कुटुंबीयांच्या वतीने वकील पंकज तामने यांच्यासह गायत्री दाणी आणि महेश देशमुख काम पाहत आहेत.